मुंबईचे आद्य शिल्पकार, हिंदुस्थानी रेल्वेचे जनक, थोर समाज सुधारक आणि शिक्षण महर्षी नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांच्या पाऊलखुणा सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये उमटणार आहेत. नानांच्या 222 व्या जयंतीचे औचित्य साधून जे.जे. स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालयाच्या आवारात प्रथमच नाना शंकरशेट यांचे भव्य तैलचित्र विराजमान होणार असून त्याचा अनावरण सोहळा 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे.
सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालयाची स्थापना करण्यात नाना शंकरशेट यांचे बहुमूल्य योगदान आणि सिंहांचा वाटा होता. नानांचे तैलचित्र या महाविद्यालयात लागावे यासाठी नाना शंकरशेट प्रतिष्ठानने पाठपुरावा केला होता. त्याला यश आले. या तैलचित्राचे अनावरण विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. राजनिश कामत, कला संचालक डॉ. संतोष क्षीरसागर, रजिस्ट्रार श्री शशिकांत काकडे, प्रतिष्ठान अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट, दैसप अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी, शिल्पकार विजय बुराडे यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. यावेळी शंकरशेट कुटुंबीय, दिनकर बायकेरीकर, चंद्रशेखर दाभोळकर, प्रतिष्ठान आणि दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे पदाधिकारी, नाना प्रेमी, महाविद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत. नानांचे तैलचित्र सुप्रसिद्ध चित्रकार प्रकाश सोनावणे यांनी साकारले आहे.