शिवरायांचा अवमान करणाऱ्या टकलू हैवानाला पुण्यात जोड्यांनी हाणले, राज्यभर शिवप्रेमींच्या संतापाचा कडेलोट

‘थरथराट’ चित्रपटात टकलू हैवानाची भूमिका साकारणारा अभिनेता राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानजनक वक्तव्य केले. यावरून राज्यभरात शिवप्रेमींच्या संतापाचा आज कडेलोट झाला. टकलू हैवानाच्या प्रतिमेला पुण्यात जोड्यांनी हाणले.

नुकतेच एका ‘युट्यूब’ चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत राहुल सोलापूरकर यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. शिवरायांनी आग्र्याहून सुटकेसाठी पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता तर लाच देऊन सुटका करून घेतली. तसेच हिरकणी अस्तित्वातच नव्हती, असे एका मुलाखतीत राहुल सोलापूरकर म्हणाले. त्याच्या वक्तव्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली. याप्रकरणी अनेक स्तरांतून राहुल सोलापूरकर यांचा निषेध होत आहे. पुण्यात मराठा सेवक संघाने आंदोलन केले. सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारले. त्यांचे भांडारकर संस्थेतील सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी केली. दरम्यान, इतिहासाची मांडणी पुराव्याच्या आधारे करावी, अशी भूमिका इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी मांडली.

सोलापूरकरांचा हात जोडून माफीनामा  

छत्रपती शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर अखेर अभिनेता राहुल सोलापूरकर याने सोशल मीडियावरून जाहीर माफी मागितली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता, असे त्याने म्हटले आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राहुल सोलापूरकर याने शिवरायांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल हात जोडून माफी मागितली. जगभर गेली अनेक वर्षे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयीची अनेक व्याख्याने उत्तमरीत्या देण्याचा मी प्रयत्न करतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायचा हे माझ्या मनात येऊ सुद्धा शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा नखभर सुद्धा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. असेही सोलापूरकर म्हणाला.