पश्चिम रेल्वे पाच तास कोलमडली! ऐन गर्दीच्या वेळी बिघाडाचे ग्रहण; लोकलच्या रांगा, प्रवाशांचा खोळंबा

रेल्वे प्रवाशांचा मंगळवारी पश्चिम रेल्वे मार्गावर दुपारी ‘ट्रेन मॉनिटरिंग सिस्टम’मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाडय़ा 30 ते 40 मिनिटे उशिराने धावू लागल्या. त्यातून वेळापत्रक सावरत नाही तोच बोरिवली स्थानकाजवळ लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि लोकल सेवा जवळपास पाच तास पूर्णपणे विस्कळीत झाली. काही ठिकाणी लोकलच्या रांगा लागल्या. प्रवाशांचा जागोजागी खोळंबा झाला.

रेल्वे प्रशासनाने गेल्या आठवडय़ात माहीम-वांद्रे स्थानकांदरम्यान गर्डर उभारणीचे काम हाती घेतले होते. त्यानंतर माहीम-वांद्रेदरम्यान वेगमर्यादा लावण्यात आली आहे. या वेगमर्यादेवर नियंत्रण ठेवणाऱया ‘ट्रेन मॉनिटरिंग सिस्टम’मध्ये (टीएमएस) मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्या बिघाडाचा फटका बसून चर्चगेट-बोरिवली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवरील लोकलचे वेळापत्रक कोलमडले. रेल्वे प्रशासनाने अर्ध्या तासात बिघाड दुरुस्त केला, मात्र पुढील दोन ते तीन तास वेळापत्रक विस्कळीतच होते. कोलमडलेली लोकल सेवा पूर्वपदावर येत नाही तोच सायंकाळी बोरिवली स्थानकाजवळ एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला.

प्रवाशांमध्ये संतप्त प्रतिक्रिया

रेल्वे प्रशासनाने लोकलचे वेळापत्रक पूर्वपदावर आणण्यासाठी जलद गाडय़ा धीम्या मार्गावर वळवल्या. आयत्यावेळी हा मार्गबदल करताना रेल्वेकडून उद्घोषणा केली जात नव्हती. तांत्रिक बिघाड कधीपर्यंत दुरुस्त होईल, याचेही नेमके उत्तर दिले जात नव्हते. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला.