मराठीत बोलणार नाही; माझे कुणीही वाकडे करू शकत नाही! डोंबिवलीच्या ज्येष्ठ नागरिकासोबत टपाल खात्याच्या परप्रांतीय अधिकाऱ्याची मुजोरी

मंत्रालयातील अमराठी अधिकाऱ्याने कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण केल्याच्या घटनेनंतर डोंबिवलीतील सोसायटीत मराठीद्वेष्ट्यांनी सत्यनारायण पूजा आणि हळदी-कुंकू कार्यक्रमाला विरोध केला होता. यानंतर पुन्हा एकदा मराठी माणसाचा अपमान झाला आहे. मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील टपाल खात्याच्या प्रदर्शनात परप्रांतीय अधिकाऱ्याने डोंबिवलीच्या ज्येष्ठ नागरिकासोबत मुजोरी केली. 82 वर्षांच्या रमेश पारखे यांनी मराठीत माहिती द्या असे म्हणताच, ‘‘मी मराठीत बोलणार नाही. माझे कुणीही वाकडे करू शकत नाही. कुठे जायचे तिथे जा,’’ अशी या अधिकाऱ्याने अरेरावी केल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

टपाल खात्याने वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये 22 ते 25 जानेवारीदरम्यान ‘महापेक्स 25’ विशेष प्रदर्शन आयोजित केले होते. रमेश पारखे प्रदर्शनाला भेट देण्यासाठी गेले होते. खिडकी क्रमांक 32 वर पारखे मराठीत माहिती विचारत असताना अधिकाऱ्याने त्यांना हिंदीत बोलण्याचा आग्रह केला. पारखे यांनी सभ्यपणे त्यांना आपणास मराठी येत नाही का? असे विचारले. यावर उत्तर देण्याऐवजी या मुजोर अधिकाऱ्याने मराठीत न बोलल्याने माझे काहीही बिघडणार नाही, मी मराठीत बोलणार नाही अशी अरेरावी केली.

केंद्र सरकारकडे तक्रार

अपमानास्पद वागणुकीमुळे रमेश पारखे यांनी त्वरित केंद्र, राज्य सरकार आणि पेंद्रीय पोस्ट खात्याकडे लेखी तक्रार केली आहे. मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.