डिजिटल अटकेच्या नावाखाली वृद्धाची 17 लाखांची फसवणूकप्रकरणी गुजरातमधील एजंटला उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. जयदेव दवे असे त्याचे नाव आहे.
तक्रारदार महिला या पतीसोबत बोरिवली येथे राहतात. गेल्या महिन्यात त्या डिजिटल अटकेच्या खोट्य़ा घोटाळ्य़ाला बळी पडल्या. ठगाने कारवाईची भीती दाखवून त्याच्याकडून 17 लाख रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी जयदेव दवे या एजंटला ताब्यात घेतले.
जयदेव हा ग्राहकांना विविध बँक आणि खासगी वित्त पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून कर्ज मिळवून देतो. कर्ज देण्याच्या बहाण्याने तो बँक खात्याची माहिती मिळवतो. त्यानंतर सायबर फसवणुकीचे पैसे त्या खात्यात वर्ग करतो. पैसे वर्ग झाले की तो ते इतर खात्यांत वर्ग करत असायचा. त्याला ठगांकडून काही रक्कम कमिशन म्हणून मिळत असायची. त्याने फसवणुकीसाठी त्याच्या नातेवाईकाच्या बँक खात्याचा वापर केला होता. त्या खात्यात दहा लाख रुपये वर्ग केले होते. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.