योगासनात महाराष्ट्राच्या महिलांना सुवर्ण

महाराष्ट्राच्या महिलांनी उत्कृष्ट समन्वय दाखवीत 38 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धातील योगासनात सांघिक सुवर्णपदकाची कमाई करत बाजी मारली. सुवर्णासह एक रौप्य व एक कांस्यपदकही पटकावले. सुहानी गिरीपुंजे, छकुली सेलोकर, तन्वी रेडीज, रचना अंबुलकर व पूर्वा किनरे यांनी 112.13 गुण नोंदवत सुवर्ण पदक पटकावले. या खेळाडूंनी विलोभनीय रचना सादर केल्याने परीक्षकांनी त्यांना सर्वोत्तम गुण बहाल केलेच, पण प्रेक्षकांनीही टाळय़ांच्या गजरात अभिनंदन केले. पुरुषांच्या कलात्मक वैयक्तिक विभागात सोलापूरचा रूपेश सांगे याने रौप्य पदक संपादन केले. अटीतटीच्या लढतीत त्यानेदेखील अतिशय सुरेख रचना सादर केल्या होत्या. अखेर त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. त्याने 117.88 गुणांची कमाई केली. सुहानीने पारंपरिक योगासनात कांस्य पदक पटकाविले.