जलतरणात अखेरच्या दिवशी पदकांचा षटकार

महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी मंगळवारी अखेरच्या दिवशी पदकांचा षटकार ठोकून जलतरण स्पर्धेची यशस्वी सांगता केली. हिर शहा, सानवी देशवाल यांनी आपापल्या गटात रौप्यपदक जिंकले. ऋषभ दास, अदिती हेगडे, ज्योती पाटील यांना कांस्य, तर 4 बाय 100 मीटर मिश्र मिडले रिलेतही कांस्यपदक मिळाले. पुरुषांच्या 100 मीटर फ्री स्टाईल प्रकारात हिरने 51.61 सेपंद वेळेसह रौप्य, तर ऋषभने 51.71 सेकंद वेळेसह कांस्य पदक जिंकले. अदिती हेगडेने 59.49 सेकंद वेळेसह कांस्य पदक जिंकले. महिलांच्या 100 मिटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात सानवी देशवालने 1 मिनिट 16.37 सेकंद वेळेसह रौप्य, तर ज्योती पाटील हिने 1 मिनिट 17.36 सेकंद वेळेसह कांस्य पदक जिंकले. 4 बाय 100 मीटर मिश्र मिडले रिले शर्यतीत महाराष्ट्राला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. ऋषभ दास, ज्योती पाटील, मिहीर आंब्रे व अदिती हेगडे या चौकडीने महाराष्ट्राला अखेरचे पदक जिंकून दिले.