गतविजेत्या महाराष्ट्राच्या पुरुष वॉटरपोलो संघाला 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अगदी अखेरच्या क्षणी सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली अन् त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राचा महिला संघही रौप्य पदकाचाच मानकरी ठरला. पुरुषांत सेनादलाने सुवर्ण पदकाचा गवसणी घातली, तर महिलांत केरळने सुवर्ण पदकावर नाव कोरले.
पुरुष गटाची सुवर्ण पदकाची लढत अतिशय थरारक झाली. एक-एक गोलसाठी रंगलेल्या पाठशिवणीच्या खेळात मध्यंतरापर्यंत महाराष्ट्राकडे 6-5 अशी निसटती आघाडी होती, मात्र त्यानंतर सेनादलाला मिळालेल्या दोन पेनल्टीने महाराष्ट्राचा घात केला. तब्बल 14 मिनिटांनंतर सेनादलाने प्रथमच 8-8 अशी बरोबरी साधली. मग महाराष्ट्राने पुन्हा 9-8 अशी आघाडी मिळविली. त्यानंतर सेनादलाने अखेरच्या मिनिटांला जबरदस्त खेळ करत 10-9 अशी बाजी मारली. महिला गटाच्या अंतिम लढतीत केरळने महाराष्ट्राला 7-11 गोलफरकाने नमवले.
जलतरणाने तारले
गोव्यात झालेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने जलतरण स्पर्धेत एकूण 17 पदके जिंकली होती. यामध्ये 5 सुवर्ण, 9 रौप्य व 3 कांस्य पदकांचा समावेश होता. यंदाच्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या जलतरणपटूनी 6 सुवर्ण, 14 रौप्य व 15 कांस्य अशी एकूण 35 पदके पटकावत सरस कामगिरी केली. गतवेळी महाराष्ट्राने 80 सुवर्ण, 69 रौप्य आणि 79 कांस्य अशी एकूण 228 पदकांसह स्पर्धेत अव्वल स्थान पटकाविले होते. यावेळी योगासनातील निराशाजनक कामगिरीने महाराष्ट्राचे ‘नंबर वन’चे सिंहासन डळमळीत आहे. पदकतक्त्यात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे. जलतरणपपटूंनी 35 पदके जिंकून खऱ्या अर्थाने तारले आहे,
पूजाची पदक हॅटट्रिक, श्वेताला कांस्य
कोल्हापूरच्या पूजा दानोळने सायकलिंग क्रीडा प्रकारात पदकांची हॅटट्रिक पूर्ण केली. पूजाने तीन किलोमीटर अंतराच्या वैयक्तिक कौशल्य प्रकारात रौप्य पदक पटकाविले. या आधी तिने एक सुवर्ण व एक रौप्य पदक पटकावले होते. 3 किलोमीटर प्रकारात पूजाने 4 मिनिटे 04.494 सेकंदात अंतर पार करीत सलग तिसऱ्या पदकाचा नाव कोरले. महिलांच्या पाचशे मीटर्स वैयक्तिक कौशल्य क्रीडा प्रकारात श्वेता गुंजाळ हिला कांस्य पदक मिळाले त्यावेळी तिने हे अंतर 38.085 सेपंदांत पार केले.