अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपाखाली 24 वर्षीय तरुणीला अटक

एका 24 वर्षीय तरुणीने एका 17 वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी या 24 वर्षीय तरुणीला अटक केली असून तिला तुरुंगात पाठवले आहे. मुलगी हरवल्यानंतर तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध घेतला. मुलगी सापडल्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर आरोपी तरुणीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे. अल्पवयीन मुलगी दक्षिण मुंबईत आपल्या आजीसोबत राहत होती, तर तिचे पालक मुंबईच्या पूर्व भागात राहत होते. सात जानेवारीला ही मुलगी कॉलेजसाठी बाहेर पडली. तेव्हा या मुलीने आपल्या आई वडिलांना मेसेज करून सांगितले की मी घर सोडून जाते माझी कुठलीही काळजी करू नका. त्यानंतर या मुलीने आपला फोन स्विच ऑफ केला.

मुलीचे पालक घाबरून गेले आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि मुलीचा शोध सुरू केला. त्यानंतर मुलीच्या मावशीने आपली भाची हरवल्याची पोस्ट सोशल मिडीयावर पोस्ट केली. तेव्हा मुलीने आपण सुखरुप असल्याची कमेंट केली. पोलिसांनी तातडीने या मुलीचे लोकेशन शोधायला सुरूवात केली.

विरारच्या एका रिसोर्टमध्ये या दोघी असल्याचे पोलिसांनी कळाले. या दोघींनी आपण बहिणी आहोत आणि विरारमध्ये परीक्षेसाठी आल्याचे सांगितले होते. पोलिसांनी या रिसोर्टवर जाऊन दोघींनी ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिची वैद्यकीय चाचणी केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. अल्पवयीन मुलगी आपल्या पालकांकडे जायला तयार नव्हती. त्यामुळे या मुलीला सुधारगृहात पाठवण्यात आले.

एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार वर्षभरापूर्वी ही मुलगी आणि तरुणी एकमेकींच्या जवळ आल्या होत्या त्यानंतर या मुलीच्या पालकांनी तिला दुसरीकडे आपल्या नातेवाईकांकडे पाठवलं होतं. पण वर्षभरात ही मुलगी मुंबईत परत आली.