कृषीमंत्री असताना 275 कोटींचे घोटाळे केले, काहीही झालं तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाच पाहिजे; अंजली दमानिया यांची मागणी

कृषीमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी 275 कोटींचे घोटाळे केले, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. भगवान गडाने धनंजय मुंडे यांना दिलेला पाठिंबा काढून घ्यावा. भगवान गडाने आता तरी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करावी. तसेच मुंडेंना मंत्रिपदी ठेवावं का? हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावं, असे म्हणत दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.

कमीत कमी पावणे तीनशे कोटींचा हा घोटाळा आहे. हा सगळा अंधाधुंद कारभार झाला आहे. आता तरी धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत. त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा. त्यांची चौकशी लावून हा सगळा शेतकऱ्यांसाठी ठेवलेला पैसा हा परत मिळवा. आणि सर्व पैसे डीबीटी अतंर्गत घ्यावेत. या प्रकरणी सर्वच्या सर्व कागदपत्र अपलोड केले आहेत. काहीही झालं तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाच पाहिजे, असे अंजली दमानिया म्हणाल्या.

अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. कृषीमंत्री असताना नॅनो युरियाची 92 रुपयांची बॉटल 220 रुपयांना विकत घेतली. अशा 19 लाख 68 हजार 408 बॉटल्स खरेदी करण्यात आल्या. निविदेचे पैसे 16 मार्चला दिले. 30 मार्चला निविदा काढण्यात आली होती. म्हणजे पैसे अधी दिले आणि निविदा नंतर काढली गेली, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला.

नॅनो डिएपीची 261 रुपयांची बॉटल 590 रुपयांना खरेदी केली गेली. 19 लाख 57 हजार 438 बाटल्स खरेदी करण्यात आल्या. याचेही 16 मार्चला पैसे दिले आणि 30 मार्चला निविदा काढण्यात आली होती. तर 2 हजार 450 रुपयांचं फवारणी यंत्र 3 हजार 425 रुपयांना घेतलं गेलं. 2 लाख 36 हजार 427 फवारणी यंत्रांची खरेदी केली गेली. या खरेदीसाठी 28 मार्चला पैसे दिले आणि त्यानंतर 5 एप्रिलाल निविदा काढली गेली. नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीच्या खरेदीत 88 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे.

गोगलगायींसाठी वापरल्या जाणाऱ्या औषध खरेदीतही घोटाळा झाला. 817 रुपये प्रतिकिलोचं औषध 1275 रुपये प्रतिकिलो दरानं खरेदी केलं गेलं. एकूण 1 लाख 96 हजार 441 किलो औषध खरेदी केले गेले. यासाठी 16 मार्चला पैसे दिले. तर 9 एप्रिलला निविदा काढली गेली. विशेष बाब म्हणून या सर्व निविदा काढल्या गेल्या. निविदा काढलेल्या पत्रावरची तारीख मार्च महिन्यातील आहे. मात्र, या पत्रावर मंत्र्यांच्या सह्या या मे महिन्यात झाल्या आहेत. गैरव्यवहार लपवण्यासाठी बॅकडेटेल पत्र दिली गेली, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला.