आपल्या सौंदर्यामध्ये केस हे फार महत्त्वपूर्ण मानले जातात. म्हणूनच काही कारणांमुळे केस गळू लागल्यावर महिलावर्ग हा त्रस्त होतो. परंतु इथे मात्र एक अनोखी नवरी आपल्याला बघायला मिळेल, या नवरीचे नाव आहे नीहार सचदेवा.. नीहार ही हिंदुस्थानात जन्माला आली, परंतु ती वाढली मात्र अमेरिकेमध्ये.
सध्याच्या घडीला सोशल मीडीयावर नीहारच्या नावाची चर्चा रंगू लागलेली आहे. नीहार ही डिजीटल कंटेट क्रिएटर आहे. नुकतेच नीहारने लग्न केले. यावेळी तिने परिधान केलेल्या घागरा याची चर्चा तर रंगलीच, पण नीहार ही टक्कल करुनच बोहल्यावर चढली. त्यामुळे सर्वांच्याच तोंडी नीहारचे नाव आले. लहानपणापासून नीहार ही एलोपिसिया एरीटा या आजाराने त्रस्त होती. एलोपिसिया एरीटा हा एक त्वचा रोग आहे. यामध्ये त्वचेवरील केसगळती होते, खासकरुन डोक्यावरील केस गळतात. यामध्ये शरीरातील इम्यूनिटीही कमी होते. याच आजाराने नीहार लहानपणापासून त्रस्त होते.
नीहारचे लग्न ठरल्यावर तिने कुठलीही कशाचीही तमा न बाळगता, टक्कल करुन बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला. नीहारच्या या कृत्याचे सर्व माध्यमातून कौतुक होत आहे. नीहारने दाखवलेल्या याधाडसाची नोंद सर्व स्तरातून घेण्यात आली. त्यामुळेच Thebaldbrownbride या अभियानांतर्गत ती नवरी बनली. स्त्रीचे सौंदर्य केवळ तिच्या केसांमध्ये नाही तर, तिच्यातल्या आत्मविश्वासात आहे हे तिने दाखवून दिले.