मित्राचा खून : चौघांना तीन दिवसांची कोठडी

मित्राचा निघृणपणे खून केल्याची घटना क्रांतीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघांना तीन दिवसांसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी आज सोमवारी दिले.

क्रांतीनगर येथील कल्पेश रुपेकर (29) याचा क्रांतीचौक पोलीस ठाण्याच्या समोर वैभव ताराचंद मालोदे (29, रा. सहजीवन कॉलनी, समर्थनगर), वैभव राजू गिरी (25, रा. देवगिरी कॉलनी), प्रेम भानुदास तिनगोटे (24, रा. पडेगाव) आणि सौरभ अनिल भोले (24, रा. साईनगर, पडेगाव) या चौघांनी मारहाण करून निघृण खून केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री तीन वाजता घडली होती. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एकेठिकाणी आरोपी कल्पेशला मारहाण करताना दिसून आले. त्याआधारे पोलिसांनी मारहाणीमुळेच कल्पेशचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढून वरील चौघांना अटक केली होती.

आरोपींचा बनाव सीसीटीव्ही फुटेजमुळे उघड

पोलीस ठाण्याच्या समोर कल्पेश हा बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती एका एमआयएमच्या लोकप्रतिनिधीला देण्यात आली. त्याने कल्पेशला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे या चौकडीने त्याला घाटी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केल्याची माहितीही त्या माजी नगरसेवकाला दिली. कल्पेशला फिट आली व तो बेशुद्ध पडला, अशी बनावट स्टोरी आरोपींनी सांगितल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारहाणीचे चित्रीकरण सापडल्याने त्यांचा हा बनाव उघडा पडला. पोलिसांनी त्यांना अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला.