भाडेकरू बांगलादेशी निघाले तर घरमालकावरच गुन्हा, कल्याण, डोंबिवलीकरांना पोलिसांचा इशारा

घर भाड्याने देताना विशेष काळजी घ्या, भाडेकरूंची सर्व माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात द्या, जर भाडेकरू बांगलादेशी घुसखोर आढळला तर थेट गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी कल्याण आणि डोंबिवली शहरातील घरमालकांना दिला आहे. या दोन्ही शहरांत पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. बांगलादेशी नागरिक ग्रामीण परिसरासह शहरी भागातील चाळींमध्ये घरे भाड्याने घेऊन राहत असल्याचे समोर आले आहे.

बांगलादेशी घुसखोर कल्याण आणि डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणात सापडू लागल्यानंतर पोलिसांनी ग्रामीण परिसरातील चाळमालक व घरमालकांची बैठक घेतली आहे. या बैठकीत घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्याला देण्यात यावी. एखादा भाडेकरू बांगलादेशी असल्याचे लक्षात येताच तत्काळ याबाबत पोलिसांशी संपर्क साधावा. जर घरामध्ये बांगलादेशी नागरिक आढळला तर त्या घरमालकाविरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ही कारवाई टाळण्यासाठी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालक करा, अशी विनंतीही या वेळी पोलिसांकडून करण्यात आली. कल्याण व डोंबिवलीत बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण आणि डोंबिवली पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. हे बांगलादेशी नागरिक हॉटेल, बार, लॉजिंग बोर्डिंग, बांधकाम साईट्स, लेबर कॉन्ट्रॅक्टर काम करत असल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी संबंधितांना नोटिसा पाठवून कामगारांची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला देण्याचे आदेश दिले आहेत.

जादा भाड्याच्या आमिषाला बळी पडू नका

भाड्याच्या आमिषापोटी घरमालकदेखील कोणतीही विचारपूस न करता या नागरिकांना घर भाड्याने देत आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी कल्याण व डोंबिवली परिसरातील खडेगोलवलीसह ग्रामीण परिसरातील गावांमधील घरमालका चर्चा, चाळमालकांची बैठक घेतली आणि भाडेकरूंची चांगली चौकशी केल्यानंतरच घर भाड्याने देण्याच्या सूचना केल्या. वाढीव भाडे मिळते म्हणून कोणालाही घर भाड्याने देऊ नका, असाही सल्ला या वेळी पोलिसांनी घरमालकांना दिला.