भांडुपमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक 9 वर्षाची शाळकरी मुलगी शाळेतून घरी परतत असताना अज्ञाताने तिला रस्त्यात गाठलं. त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन तिला इंजेक्शन टोचलं आणि आरोपी पळून गेला. घरी आल्यानंतर मुलीने पालकांना घडला प्रकार सांगितला. यानंतर पालकांनी मुलीला आधी रुग्णालयात नेले. मग पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी मुलीच्या पालकांच्या फिर्यादीनुसार तक्रार दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथके तैनात केली आहेत. पोलीस शाळेच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत. शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचेही जबाब नोंदवण्यात येत आहेत. तसेच मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.