उत्तन-विरार सी लिंक मच्छीमारांच्या मुळावर, पर्यायी मार्ग शोधण्याची स्थानिकांची मागणी

उत्तन ते विरार हा प्रस्तावित सी लिंक मच्छीमारांच्या मुळावर येणार आहे. या सी लिंकमुळे स्थानिक मासेमारीला मोठा फटका बसणार असून मच्छीमार देशोधडीला लागणार आहेत. या सी लिंकला कडाडून विरोध करीत त्याला पर्यायी मार्ग शोधा अशी मागणी स्थानिक मच्छीमारांनी केली असून हा प्रकल्प जबरदस्तीने रेटण्याचा प्रयत्न केला तर हजारो मच्छीमार कुटुंबासह रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या एमएमआरडीएच्या माध्यमातून उत्तन ते विरार दरम्यान सी लिंक प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याचे सादरीकरण करण्यासाठी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक मच्छीमारांना विश्वासात घेण्यासाठी नुकतेच एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या सी लिंकमधून वर्सोवा, मार्वे, गोराई व मनोरी या गावांना वगळण्यात आले असले तरी इतर ठिकाणी असलेल्या मच्छीमारांच्या व्यवसायावर परिणाम होणार असून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. या सभेला उत्तनमधील पाच मच्छीमार सहकारी संस्था, स्थानिक मच्छीमार व इतर स्थानिकांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील, मच्छीमार नेते बर्नाड डिमेलो, लिओ कोलासो, जॉर्ज गोविंद, रेनॉल्ड बेचरी असे अनेक मच्छीमार संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कृती समितीच्या बैठकीत शंका

वर्सोवा ते उत्तन हा सागरी सेतू न बांधता प्रथम उत्तन ते विरार हा सागरी सेतूचा प्रकल्प हाती घेण्यात का आला यावर अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो यांनी शंका उपस्थित केली. पश्चिम महामार्गापासून सागरी सेतूचे भरपूर अंतर आहे. त्याचा फायदा स्थानिक नागरिकांना होणार नाही. तसेच मच्छीमारांना त्यांच्या व्यवसायात नुकसान होईल, त्यामुळे या सी लिंकला मच्छीमारांनी विरोध दर्शविला.

■ उत्तन समुद्रकिनाऱ्यापासून एक किमी अंतरावर सागरी सेतू बांधणार असल्याने समुद्रातील पाण्याच्या प्रवाहाने तेथे भराव जमा होऊन तिथून मच्छीमार बोटीचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद होईल.

■ एमएमआरडीएने ज्याप्रमाणे उत्तनमध्ये सभा घेतली त्याप्रमाणे विरारच्या अर्नाळा, वसई, नायगाव, खोचिवडे, रानगाव येथे सभा घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.