>> वसंत वसंत चव्हाण
विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना चाप बसावा यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी अनोखी शक्कल लढवत टायर किलर बसवले. मात्र आता या टायर किलरने नागरिकांच्या डोक्याचा ताप वाढला असून अनेक ठाणेकर रक्तबंबाळ झाले असल्याची बाब समोर आली आहे. या टायर किलरने अवघ्या 24 तासांत 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही संकल्पना चांगली असली तरी वाहतूक शाखेचा रोगापेक्षा इलाज भयंकर झाला आहे. दरम्यान, जखमी पादचाऱ्यांना थेट रुग्णालय गाठावे लागत असल्याने स्टेशन परिसरात बसवण्यात आलेल्या टायर किलरची जागा बदलावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.
विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना चाप बसवण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेने ‘टायर किलर’ नवी संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. ठाणे स्टेशन परिसरातील पंजाब नॅशनल बँकेसमोर प्रायोगिक तत्त्वावर रविवारी सायंकाळी पहिला टायर किलर बसवण्यात आला. त्यानंतर नियमांना पायदळी तुडवणाऱ्यांना चांगलाच दणका बसेल असा विश्वास वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिला. मात्र आता हे टायर किलर जीवघेणे ठरू लागले असल्याचे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अंधारात धोका वाढला
ठाणे स्टेशनमधून बाहेर पडणारी सर्व वाहने पंजाब नॅशनल बँकेसमोर जातात. मुळात ज्या ठिकाणी टायर किलर लावले आहेत, त्या रस्त्यावरून विरुद्ध दिशेने कोणतेच वाहन जात नाही. असे असताना स्टेशनसारख्या गजबजलेल्या परिसरात टायर किलर लावल्याने पादचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. तसेच रात्री अंधारात हे किलर दिसून येत नसल्याने धोका वाढला आहे.
तिघांच्या तळव्याला खोलवर जखम
अपघातात संतोष जाधव आणि जतीन कानोजिया व सुगंधा माने या तिघांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. टायर किलरला असलेले खिळे पायाच्या तळव्यात खोलवर घुसले असून तिघांना जोरदार रक्तस्त्राव झाला. जखमींना तत्काळ रुग्णालयांत जाऊन इंजेक्शन घ्यावे लागले आहे, तर उर्वरित जखमी झालेल्यांवर उपचार सुरू आहेत.
प्रायोगिक तत्त्वावर हे बसविण्यात आले असून 15 दिवसांचा अभ्यास केल्यानंतर त्या ठिकाणी टायर किलर ठेवण्यात यावा की काढावा, हे ठरविण्यात येईल.
पंकज शिरसाठ, (उपायुक्त ठाणे वाहतूक पोलीस)