चेंगराचेंगरीची घटना दुर्दैवी, सर्वोच्च न्यायालयाचे मत; सुरक्षेतील बेपर्वाईवर व्यक्त केली चिंता

प्रयागराज येथील महाकुंभमेळय़ात चेंगराचेंगरी होऊन 30 भाविकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे किंबहुना हा चिंतेचा विषय आहे, असे मत व्यक्त करीत न्यायालयाने सुरक्षेच्या मुद्दय़ावर चिंता व्यक्त केली. भाविकांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे आखण्याची मागणी करणाऱया याचिकेत हस्तक्षेप करण्यास मात्र न्यायालयाने नकार दिला आणि याचिकाकर्त्यांना याबाबत उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले.

हलगर्जीपणाबद्दल जबाबदार अधिकाऱयांवर कारवाईचे तसेच भाविक सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे आखण्याचे निर्देश द्या, अशी मागणी करीत अॅड. विशाल तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. सोमवारी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने या याचिकेची गंभीर दखल घेतली आणि महाकुंभमेळय़ातील भाविकांच्या सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. सुरक्षेची पुरेशी खबरदारी न घेतल्याने 30 भाविकांना प्राण गमवावा लागला ही दुर्दैवी घटना आहे. मोठय़ा प्रमाणावर गर्दीची शक्यता असतानाही सुरक्षेतील हलगर्जीपणामुळे भाविकांचा मृत्यू होतो, हा निश्चितच चिंतेचा विषय आहे. मात्र चेंगराचेंगरीच्या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी आधीच न्यायीक आयोग स्थापन केला आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात जावे, असे सरन्यायाधीशांनी नमूद केले.

हायकोर्टात आणखी एक याचिका दाखल

चेंगराचेंगरीच्या अनुषंगाने अलाहाबाद उच्च न्यायालयात आधीच एक याचिका दाखल झालेली आहे. तसेच घटनेच्या चौकशीसाठी न्यायिक आयोग स्थापन केलेला आहे, असे योगी सरकारतर्फे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितले.