नाशिक येथे सोमवारी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीवेळी शेवटच्या तासाभरात झालेल्या 76 लाख इतक्या मतदानावरून मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी महायुतीला सणसणीत चपराक लगावली. ते 76 लाख मतदान कळीचा मुद्दा असून, निकाल लागल्यापासून जाणकार प्रश्न विचारत आहेत. हाच खरा घोटाळा असून त्याचे उत्तर निवडणूक आयोग देऊ शकलेले नाही, आम्ही सगळे त्यांच्याकडे गेलो, त्यांचे म्हणणे एकच ‘ऐसा हो सकता है’. म्हणजे काय असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला. त्या 76 लाखांची विभागणी केली तर साधारण 150 मतदारसंघात प्रत्येकी 20 ते 25 हजार म्हणजेच प्रत्येक बूथवर 100 ते 150 मतं वाढवून त्यांचे सरकार आले. ते सरळ मार्गाने आलेले नाही. पडद्यामागे मोठी पटकथा लिहिली गेली असून, अनेक खलनायकांनी यात काम केलं. प्रचंड मताधिक्याची खात्री होत नसल्याने महायुतीच्या आमदारांनी विजयी मिरवणुकाही काढल्या नाहीत, असा टोला हाणला. या प्रश्नाच्या टोकांपर्यंत गेले तरच देशातील लोकशाहीला भक्कम आधार मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपनेते सुनील बागुल, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
तो पक्ष एकसंघ राहणे कठीण
एकनाथ शिंदे चालवत असलेला तो पक्ष अमित शाह यांचाच आहे, तो भविष्यात एकसंघ राहणे कठीण दिसतेय, त्या पक्षातील 20 पेक्षा जास्त आमदार देवेंद्र फडणवीस यांचेच आहेत. अजित पवार गटाचे 17 ते 18 आमदार भाजपानेच दिलेले आहेत, त्यामुळे मला त्या दोन्ही गटांचे काही खरे वाटत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.