साईनगरी शिर्डीत नेहमीच भक्तांची प्रचंड गर्दी असते. मात्र, आता शिर्डीत कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी प्राणघातक हल्ले करण्यात आले. त्यात चाकूने भोसकून साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली असून, एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, हे हल्ले सीसीटीव्हीत पैद झाले असून एका हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेची अपघाती नोंद केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
सुभाष साहेबराव घोडे (45) व नितीन कृष्णा शेजुळ (32) अशी मृत कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर कृष्णा देहरकर असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. कृष्णावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी पहाटे चार ते साडेपाच दरम्यान विमानतळ रस्त्याला वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्या. मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी या तिघांना अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली आणि चाकूने भोसकल़े चोरीच्या उद्देशाने हे हत्याकांड झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सीसीटीव्हीमध्ये हे तीन हल्ले पैद झाले आहे.
पोलीस व्हीआयपी दर्शन प्रोटोकॉलमध्ये व्यस्त
शिर्डीत पोलीस व्हीआयपी दर्शन प्रोटोकॉलमध्ये व्यस्त असतात, असा घरचा आहेर भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी स्वपक्षाच्या सरकारला दिला आहे. प्रोटोकॉलसाठी स्वतंत्र पोलीस नेमण्यात यावेत. ज्या पोलिसांना खून व अपघात यातील फरक कळत नाही त्या पोलिसांना निलंबित करावे. पोलीस निरीक्षकावरही कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
नागरिकांनी सतर्क राहवे ः विखे–पाटील
शिर्डीत येत्या आठ दिवसात कोम्बिंग ऑपरेशन करून गुन्हेगारांना जेरबंद करावे, पोलिसांचा हलगर्जीपणा असेल तर त्यांच्यावरही कारवाई करावी, अशा सूचना आपण जिल्हा पोलीस प्रमुखांना दिल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. शिर्डीतील नागरिकांनी सतर्क राहवे, असा सल्लाही त्यांनी दिला.