>>विठ्ठल देवकाते
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णापेक्षा रौप्य पदकांवरच अधिक समाधान मानावे लागत असल्यामुळे महाराष्ट्राची पदक तालिकेत खूपच पीछेहाट झाली आहे. योगासनांमध्ये महाराष्ट्राला आपले वर्चस्व राखण्यात अपयश आल्यामुळे 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवसअखेर 15 सुवर्णांसह 61 पदके जिंकत पदकतालिकेत तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. मात्र कर्नाटकने जबरदस्त कामगिरी करताना सर्वाधिक 22 सुवर्ण जिंकत खूप मोठी आघाडी मिळवली आहे. सेनादलाचा संघ 19 सुवर्णांसह दुसऱ्या स्थानी कायम आहे.
स्क्वॉश – दोन रौप्य व एक कांस्य
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राहुल बैठा व अंजली सेमवाल यांनी रौप्य, तर सूरज चंदने कांस्यपदक जिंकून महाराष्ट्राला स्क्वॉशमध्ये सर्वसाधारण उपविजेतेपद मिळवून दिले.
स्क्वॉशमधील पुरुषांच्या एकेरीत महाराष्ट्राच्या राहुल याला आंतरराष्ट्रीय खेळाडू व अग्रमानांकित खेळाडू व्ही. सेंथिलकुमार याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. चुरशीच्या लढतीनंतर सेंथिलकुमार याने हा सामना 11-6, 11-9, 11-7 असा जिंकला. या लढतीमध्ये सेंथिल कुमार याने परतीच्या फटक्यांचा सुरेख खेळ केला. राहुल याने क्रॉस कोर्ट फटके मारीत चांगली लढत दिली; मात्र अखेर त्याला पराभव पत्करावा लागला.
महिलांच्या एकेरीत अंजली हिला गोव्याची खेळाडू आकांक्षा साळुंखे हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. एकतर्फी झालेल्या लढतीत आकांक्षा हिने 11-6,11-5,11-4 असा विजय मिळवताना चतुरस्र खेळाचा प्रत्यय घडविला.
वॉटरपोलो – दोन्ही संघ अंतिम फेरीत
महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी वॉटरपोलोमधील आपली विजयी घोडदौड कायम राखत 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. उपांत्य लढतीत महाराष्ट्राच्या महिला संघाने कर्नाटकविरुद्ध पेनल्टी शूटआऊटपर्यंत ताणलेल्या लढतीत विजय मिळविला, तर पुरुष संघाने प. बंगालला सहज पाणी पाजत रुबाबात फायनल गाठली. आता सुवर्णपदकाच्या लढतीत महाराष्ट्रापुढे महिला गटात केरळचे, तर पुरुष गटात सेनादलाचे आव्हान असेल.
तिरंदाजीत सुवर्ण चौकाराची संधी
योगासनामध्ये मागे पडलो असलो तरी तिरंदाजीत महाराष्ट्राच्या महिला संघांनी अचूक वेध साधला आहे. रिकर्व्ह व कंपाऊंड या दोन्ही प्रकारातील सांघिक गटासह रिकर्व्ह मिश्र व इंडियन मिश्र या गटातही अंतिम फेरीत मजल मारल्याने महाराष्ट्राला चार सुवर्णपदक जिंकण्याची संधी प्राप्त झाली आहे. तिरंदाजीत सुवर्ण पदकांवर नेम लागला तर महाराष्ट्र पुन्हा एकदा अव्वल स्थानासमीप पोहोचू शकतो. या स्पर्धेतील रिकर्व्ह विभागात महाराष्ट्राने पश्चिम बंगाल संघावर 6-0 असा दणदणीत विजय मिळविला. सबज्युनिअर गटात खेळणाऱ्या गाथा खडके, वैष्णवी पवार, शर्वरी शेंडे यांनी वरिष्ठ खेळाडूंवर मात करीत महाराष्ट्राचा झेंडा फडकवत ठेवला. महाराष्ट्राला अंतिम फेरीत झारखंड संघाच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. या संघात जागतिक विजेती दीपिका कुमारीचा समावेश आहे. उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राने मध्य प्रदेश संघाचे आव्हान 6-2 असे संपुष्टात आणले होते. झारखंडने उपांत्य फेरीत हरयाणाचा 6-2 असा पराभव केला.