द एशियाटिक सोसायटीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न चिघळला आहे. कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याचे वेतन मिळालेले नाही. उलट व्यवस्थापनाकडून संस्थेला टाळे लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. वेतनाच्या प्रश्नावरून ‘एशियाटिक’चे काम बंद पडले आहे. याचा फटका संस्थेच्या सदस्यांना बसत आहे.
एशियाटिक सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याचे वेतन देण्यात आलेले नाही. यासंदर्भात कर्मचारी – व्यवस्थापनामध्ये बैठक झाली. मात्र या बैठकीत 50 टक्के वेतन स्वीकारा, असे कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले. ‘राजीनामा द्या, आम्ही 90 दिवसांत पैसे देतो. राजीनामा नाही दिला तर टाळेबंदी करू,’ अशी धमकी दिल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.
यासंदर्भात एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई एम्प्लॉयईज युनियनचे अध्यक्ष (आयटक संलग्न) प्रकाश रेड्डी म्हणाले, संस्थेच्या कर्मचाऱ्यांना पगार नाही, सही करायला दिली जात नाही. नाहक त्रास दिला जात आहे. व्यवस्थापन संस्थेसाठी निधी आणण्यात अपयशी ठरले आहे. त्यातच मॅनेजिंग कमिटीचा गैरव्यवहार सुरू आहे. संस्थेच्या 220 वर्षांच्या इतिहासात असे कधी झाले नाही. त्यामुळे व्यवस्थापनाने राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे.
सरकारने संस्था ताब्यात घ्यावी
एशियाटिक सोसायटी या ऐतिहासिक संस्थेत 2 लाख 20 हजार पुस्तके आहेत. यामध्ये अनेक दुर्मीळ ग्रंथांचा समावेश आहे. संस्थेत सध्या 25 कर्मचारी आहेत. मुंबईचा हा सांस्पृतिक ठेवा जतन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने व्यवस्थापन कमिटी बरखास्त करून संस्था ताब्यात घ्यावी, अशी मागणी कर्मचारी युनियनने केली आहे.