मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आता पटेनासे झाले आहे. मुख्यमंत्री पद, मलईदार खाती, पालकमंत्री पदे अशा प्रत्येक वेळी शिंदे यांची नाराजी दिसून आली होती. अजूनही ती कायम असल्याचे आज पुन्हा दिसले. मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलवलेल्या बैठकीकडे शिंदे यांनी पाठ फिरवली. इतकेच नव्हे तर, नगरविकास आणि पाणीपुरवठा विभागाच्या बैठकाही त्यांनी रद्द केल्या. त्यामागचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात सोशल वॉर रूमची बैठक आज पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्री त्या बैठकीला उपस्थित होते. पण एकनाथ शिंदे यांनी मात्र त्या महत्त्वाच्या बैठकीला जाणे टाळले. शिंदेंकडे असलेल्या नगरविकास विभागाबरोबर पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठकही आज नियोजित होती; पण त्या दोन्ही बैठका शिंदे यांनी ऐनवेळी त्यांच्या यादीतून रद्द केल्या. मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदे गैरहजर राहतात अशी चर्चा असताना अन्य महत्त्वाच्या बैठकांनाही ते दांडी मारू लागल्याने ते पुन्हा एकदा नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
वारंवार डावलले जात असल्याने रुसले
यापूर्वीची रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून वाद उद्भवला तेव्हा त्यांनी गावी जाणे पसंत केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दोन्ही जिह्यांच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. त्यातच शिंदे यांच्याकडेच रायगडचे पालकमंत्री पद देऊन त्यांच्याकडील मुंबई शहराचे पालकमंत्री पद काढून घेण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या हालचाली सुरू आहेत. नव्या सरकारमध्ये प्रत्येक वेळी डावलले जात असल्यामुळे शिंदे नाराज असल्याचे बोलले जात आहे.