सोन्यासारखे घर सोडून पत्र्याच्या घरात का जाऊ? धारावी सोडण्यास कुंभारवाडय़ातील रहिवाशांचा ठाम विरोध

धारावीतील आमचे घर हे सोन्याचे घर आहे. हे घर सोडून आम्ही मुलुंडमधील पत्र्याच्या घरात का जाऊ, असा प्रश्न करत आम्ही झोपडय़ांमध्ये राहत नाही, तर पारंपरिक व्यावसायिक आहोत. आम्हाला विकास हवा आहे पण आमची घरे, आमच्या जमिनी आणि आमचा व्यवसाय हा आमच्या पणजोबांपासून असून तो सोडून आम्ही इतरत्र कुठेही जाणार नाही, असे धारावीतील 8 हजारांची लोकसंख्या असलेल्या कुंभारवाडय़ातील रहिवाशांनी अदानी आणि भाजप सरकारला ठणकावले आहे.

अदानी समूहाची कंपनी नवभारत मेगा डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड (एनएमडीपीएल) धारावीचा पुनर्विकास करणार आहे. मात्र, धारावीकरांचा याला ठाम विरोध आहे. धारावीत सर्वेक्षण करून पात्र-अपात्रांची यादी निश्चित करण्यात आली नसताना आता कुंभारवाडय़ातील मूठभर लोकांना मुलुंडमध्ये फिरायला नेऊन धारावीकर मुलुंडमध्ये जायला तयार आहेत, असे चित्र रंगवले जात आहे. मात्र, मुलुंडमध्ये फसवून नेलेल्या धारावीकरांनी कंपनीच्या हातचलाखीला बळी पडणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे.

सर्वेक्षणच झाले नाहीमग पुनर्वसनाचा प्रश्न येतो पुठे

अदानीच्या ‘एनएमडीपीएल’ कंपनीने धारावीकरांचे सर्वेक्षणच सुरू केलेले नाही. जे सर्वेक्षण सुरू आहे त्यात भीती दाखवून किंवा आमिष दाखवले जात आहे. हे खरे सर्वेक्षणच नाही. सर्वेक्षणच झाले नाही तर मग धारावीबाहेर लोकांचे पुनर्वसन करण्याचा प्रश्नन निर्माण होत नाही. प्रत्येक धारावीकर याला ठामपणे विरोध करेल, असा इशारा धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक शिवसेनेचे माजी आमदार बाबूराव माने यांनी दिला आहे.

 कुंभारवाडा सोडून जाणार नाही

धारावीची जागा ही सोन्याची जागा आहे. इथे विमानतळ, बस आगार, मध्य आणि पश्चिम रेल्वेची स्थानके, शाळा, महाविद्यालये हाकेच्या अंतरावर आहेत. असे असताना 12 एकरची कुंभारवाडय़ाची ही जागा सोडून आम्ही बाहेर कुठेच जाणार नाही, असा निर्धार कुंभारवाडय़ातील व्यावसायिक सुरेश मेवडा यांनी व्यक्त केला आहे.

कुंभारवाडय़ाचा विकास करा!

आम्हाला कल्पना न देता कंपनी आम्हाला मुलुंडमध्ये घेऊन गेली होती. मात्र, तिथे जाऊनही आम्ही मुलुंडमधील धारावीकरांच्या पुनर्वसनाला विरोध केला आहे आणि करत राहणार. आम्ही कुंभारवाडय़ात राहणार आहोत. त्यातच आम्ही खूश आहोत, असे रहिवासी धनसुख परमार यांनी सांगितले.