देवाभाऊंच्या राज्यात लाडक्या बहिणी असुरक्षित… भयभीत, अंबरनाथमध्ये भरदिवसा महिलेची भोसकून हत्या

अंबरनाथमध्ये एका माथेफिरू तरुणाने भरदिवसा महिलेची तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केली. सीमा कांबळे असे मृत महिलेचे नाव आहे. रेल्वे पुलावर घडलेल्या या हत्याकांडाने खळबळ उडाली असून हल्लेखोर तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. राहुल भिंगारकर असे आरोपीचे नाव असून पैशाच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. मृत महिला अंबरनाथच्या बारकूपाडा भागातील आहे. पुलावर दोघांमध्ये जोरजोरात भांडण सुरू असताना पादचाऱ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र राहुलने तिला भोसकले.

वांद्र्यात रिकाम्या ट्रेनमध्ये हमालाचा महिलेवर बलात्कार

वांद्रे टर्मिनसमध्ये रेल्वेच्या डब्यात 55 वर्षीय महिलेवर एका हमालाने शनिवारी मध्यरात्री अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. पीडित महिला आपल्या नातेवाईकांसह मुंबई पाहण्यासाठी आली होती. मात्र रात्री उशिरा ते मुंबईत पोहोचल्याने त्यांनी वांद्रे स्थानकातच राहण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी प्लॅटफॉर्म नंबर 6 व 7 वर पीडित महिलेने आश्रय घेतला असताना एका हमालाने तिला जबरदस्तीने जवळच्याच रेल्वेत नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचारातील आरोपी सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे पोलिसांनी अवघ्या दीड तासातच त्याला अटक केली.