MMRDA ला घरे भाडय़ाने देऊन शिवशाही मालामाल

ठाणे-बोरिवली ट्विन टनेल प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मागाठाणे येथील झोपडीधारकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या (एसपीपीएल) संक्रमण शिबिरातील 343 घरे नुकतीच एमएमआरडीएला भाडेतत्त्वावर देण्यात आली आहेत. या माध्यमातून शिवशाहीला 4.5 कोटींचा महसूल मिळाला आहे.

पश्चिम उपनगरवासीयांना थेट ठाण्याशी जोडण्यासाठी ठाण्यातील टिपूजीनी वाडी ते बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या दरम्यान  11.80 किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गाचे काम एमएमआरडीएकडून सुरू आहे. या प्रकल्पामुळे बाधीत होणाऱ्या मागाठाणे येथील 343 रहिवाशांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी एमएमआरडीएने शिवशाहीकडून 343 घरे भाडेतत्त्वावर घेतली आहेत. प्रत्येकी 300 चौरस फुटांची ही घरे असून त्यातील 290 घरे कांदिवलीतील गणेश नगर आणि 29 घरे बाबरेकर नगर येथील आहेत. तर 24 घरे दहिसर पश्चिमेला आहेत.

शिवशाहीची घरे एमएमआरडीएला भाडेतत्त्वावर देण्यात आली असून सध्या अकरा महिन्यांसाठी भाडेकरार करण्यात आला आहे. या माध्यमातून शिवशाहीला 4.5 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे, अशी माहिती शिवशाहीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.