संगीत क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा ग्रॅमी 2025 सोहळा लॉस एंजेलिस येथील क्रिप्टो डॉट कॉम अरेना येथे झाला. अमेरिकन गायिका- गीतकार बियॉन्से हिने पुन्हा एकदा सर्वोत्तम कामगिरी करत 34 वा पुरस्कार आपल्या नावावर केला. बियॉन्सेने ज्या एका श्रेणीत पुरस्कार जिंकला, त्या श्रेणीत गेल्या 50 वर्षांत पहिल्यांदाच एका कृष्णवर्णीय महिलेने पुरस्कारावर नाव कोरले. हिंदुस्थानी वंशाच्या गायिका चंद्रिका टंडन यांनीही पुरस्कारावर मोहोर उमटवली. ग्रॅमीमध्ये एकूण 94 श्रेणीत पुरस्कार देण्यात आले. गायिका शकीरा हिला पुरस्कार मिळाला. गायिका बियॉन्सेला 2024 च्या ‘काऊबॉय कार्टर’ या अल्बमसह 11 नामांकने मिळाली. बियॉन्सेच्या नावाची घोषणा झाल्यावर ती चकीत झाली. बियॉन्से म्हणाली, खरंच मी याची अपेक्षा केली नव्हती. इतक्या वर्षांनंतर मला जे आवडते ते मी करू शकले यासाठी मी देवाचे आभार मानते असेही ती म्हणाली.