देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या अयोध्येतील दलित तरुणीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. पोलीस सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन आरोपींबाबत खुलासा करण्याची शक्यता आहे.
पीडित 22 वर्षीय तरुणी 27 जानेवारीपासून बेपत्ता होती. कुटुंबीयांनी पोलिसात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रारही केली होती. त्यानंतर शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी तरुणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत गावापासून 500 मीटर अंतरावर कालव्याजवळ आढळला. तरुणीच्या शरीरावर खोल जखमा होत्या, तसेच तिचे डोळे गायब होते.
पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली, पोलिसांनी वेळेत तरुणीचा शोध सुरू केला नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
अयोध्येतील कोतवाली तहसिलअंतर्गत सहनवा गावात ही घटना घडली. पीडित तरुणी 30 जानेवारी रोजी रात्री भागवत कथा कार्यक्रमासाठी घरुन गेली ती परतलीच नाही. कुटुंबीयांनी संपूर्ण गावात तिचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. त्यानंतर शनिवारी तिचा मृतदेह आढळला.