गर्भवती महिलेच्या गर्भात आणखी एक गर्भ आढळल्याची दुर्मीळ घटना बुलढाणा येथे समोर आली होती. नऊ महिने पूर्ण झाल्याने 1 फेब्रुवारी रोजी महिलेची प्रसूती करण्यात आली. जिल्हा स्त्री रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी ही प्रसूती केली. सध्या आई आणि बाळ दोघांची प्रकृती चांगली असून, बाळाला पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी दिली.
वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत दुर्मीळ मानली जाणारी घटना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली. 32 वर्षीय गर्भवती महिलेच्या गर्भातील बाळाच्या पोटातही एक गर्भ असल्याचे निदान झाले होते. वैद्यकीय भाषेत याला ‘फीटस इन फीट्टू’ असे म्हणतात. सोनोग्राफीच्या तपासणीत महिलेच्या गर्भात असलेल्या बाळाच्या पोटात अजून एका गर्भ असल्याचे स्पष्ट झाले होते. हा गर्भ 35 आठवड्यांहून अधिक विकसित झाल्याचे दिसून आले, तसेच त्यामध्ये काही हाडे आणि गर्भासारखी संरचना आढळली होती. 9 महिने पूर्ण झाल्यानंतर या महिलेची 1 फेब्रुवारी रोजी रात्री प्रसूती करण्यात आली. प्रसूतीनंतर आई आणि बाळाची प्रकृती स्थिर आहे. मात्र, बाळाच्या पोटातील गर्भ काढण्यासाठी पुढील उपचार आवश्यक असल्याने त्याला अमरावती येथे पाठवण्यात आले आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांनी ही प्रसूती केली.