गोव्याहून घरी परतत असताना बस उलटली, एकाचा मृत्यू; 30 हून अधिक जखमी

गोव्याला सुट्टीची मजा घेऊन संभाजीनगरला घरी परतत असताना कोल्हापूरमध्ये कर्मचाऱ्यांची बस उलटली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 30 हून अधिक जखमी झाले. अमोल परशुमराम भिसे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी कंपनीतील 143 कर्मचाऱ्यांना घेऊन चार बस 30 जानेवारीला गोव्याला रवाना झाल्या. गोव्यात मजा लुटून सर्वजण रविवारी सायंकाळी परतीच्या प्रवासाला निघाले. यादरम्यान रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्यातील कांडगावजवळ वळणावर एका बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली.

याबसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर अन्य जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे.