मुलांच्या लैंगिक अत्याचाराचे आणि महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. समाजमाध्यमातून होणारे चॅट, गेमिंग साइट्समुळे असे गुन्हे घडताना दिसतात. या गुन्ह्यांची नोंद खूप कमी प्रमाणात होते. ज्येष्ठ नागरिकदेखील याला बळी पडतात. समाजाने पीडिताला दोष देण्यामुळे 92 टक्के महिला याबद्दल बोलत नाहीत, अशी खंत अॅड. वैशाली भागवत यांनी व्यक्त केली.
श्री देवदेवेश्वर संस्थानअंतर्गत सारसबाग मंदिरातील श्री सिद्धिविनायक देवतेच्या वार्षिक महोत्सवात आयोजित ‘डिजिटल व सायबर क्राइम’ या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. श्री देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त रमेश भागवत, संस्थानचे विश्वस्त सुधीर पंडित, पुष्कर पेशवा, जगन्नाथ लडकत, आशीष कुलकर्णी उपस्थित होते.
अॅड. वैशाली भागवत म्हणाल्या, ‘भारतासारख्या देशात ‘सेक्शुअल टुरिझम’ होते. बाहेरच्या देशांतील लोकांना समाजमाध्यमाच्या माध्यमातून आपल्या मुलांपर्यंत पोहोचणे सोपे आहे. पालकांनी मुलांबाबत सजग असणे गरजेचे आहे.’
भागवत म्हणाल्या, ‘आधार कार्डवर अतिशय संवेदनशील माहिती असते. त्यामुळे सहजरित्या आपले आधार कार्ड कोणालाही देऊ नका.’
रमेश भागवत म्हणाले, ‘जे तंत्रज्ञान आपल्यासाठी उपयुक्त वाटते, ज्याच्या माध्यमातून आपण सहज कितीतरी गोष्टी करतो, ते तंत्रज्ञान तितकेच घातक आहे. त्यामुळे जबाबदारीने सतर्क होऊन तंत्रज्ञान वापरले पाहिजे. अशक्य वाटले तरी योग्य काळजी घ्यायला हवी; नाहीतर त्याची किंमत मोजावी लागते.’