दक्षिणेकडील राज्यातील नेतेमंडळी, अभिनेते, साहित्यिक त्यांच्या भाषेसाठी एकत्र येतात. कर्नाटक राज्यातील सर्वपक्षीय नेते कावेरी नदीच्या पाणीप्रश्नात एकत्र आल्याचे आपण पाहिले. अशाच पद्धतीने राज्यातील सर्व नेते, अभिनेते, साहित्यिक यांनी मतभेद सोडून मराठी भाषेसाठी एकत्र आल्यास, कोणीही मराठी भाषेला आणि मराठी माणसाला हात लावायची हिंमत करणार नाही, असे परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी व्यक्त केले.
तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाची सांगता राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या समारंभात राज ठाकरे यांच्या हस्ते अभिनेते रितेश देशमुख यांना ‘कलारत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. या वेळी मराठी भाषा मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, रवींद्र शोभणे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, राजेश पांडे आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, ‘कश्मीरमध्ये 370 कलम काढल्यानंतर, बाहेरील लोकांना तेथे जमिनी घेता येतात. मात्र, आजही हिमाचल, आसाममध्ये इतर राज्यांतील जमीन विकत घेऊ शकत नाही. अशावेळी महाराष्ट्रात विकासाच्या नावाखाली खासगी कंपन्या, उद्योजकांना का मोकळीक दिली आहे.’
पुढील विश्व मराठी संमेलन नाशिकला…
■ मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले, ‘विश्व मराठी संमेलन राज्यातील विविध ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील संमेलन नाशिक शहरात घेतले जाईल.’
साहित्यिकांना मार्ग दाखवायला हवा
■ साहित्यिकांनी बोललं पाहिजे. त्यांनी आपली रोखठोक मते मांडायला हवीत. साहित्यिकांना केवळ पुस्तक लिहून चालणार नाही, तर मार्ग दाखवायला हवा. त्यांनी आपली भूमिका मांडायला हवीत. साहित्यिक बोलायला लागतील, तेव्हा लोक ऐकतील. त्यातून त्यांची पुस्तकेही अधिक वाचली जातील, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.