अमेरिकेतील विमानतळांवर हिंदुस्थानींना अनेकदा इमिग्रेशन अधिकारी अडवून त्यांची चौकशी करतात, पासपोर्ट असताना देखील त्यांना अत्यंत चुकीची वागणूक दिली गेल्याचं ऐकलं आहे. आता बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेश याने त्याच्या अमेरिकेच्या भेटीतील एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. नील नितीन मुकेश याला त्याला न्यूयॉर्क विमानतळावर ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्या राष्ट्रीयत्वाबद्दल पुरावा सादर करावा लागला. मात्र हिंदुस्थानचा पासपोर्ट असून देखील तो हिंदुस्थानी असल्याचे इमिग्रेशन अधिकारी मानण्यास तयार नव्हते. तब्बल चार तास ताब्यात ठेवून नंतर चौकशी करण्यात आल्याचं मॅशेबल इंडियाशी बोलताना त्यानं सांगितलं. नीलने खुलासा केला की, हिंदुस्थानी पासपोर्ट असूनही, इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तो हिंदुस्थानी असल्याचे मानण्यास नकार दिला. एका चित्रपटाच्या शुटींगसाठी तो गेला असता, ही घटना घडली असल्याचं त्यानं मुलाखतीमध्ये सांगितलं.
अभिनेता नील नितीन मुकेशला न्यूयाॅर्क विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. आपल्याकडे हिंदुस्थानी पासपोर्ट आहे यावर पोलिसांचा विश्वास बसत नव्हता. इतकंच नव्हे तर, पोलिसांनी माझा जबाब नोंदवायला आणि म्हणणं मांडायलाही मनाई केली होती. तब्बल चार तास चौकशीनंतर पोलिसांनी माझं मत विचारलं… त्यावेळी मी त्यांना फक्त इतकंच म्हटलं की, गुगल करा मग तुम्हाला कळेल. चौकशी अधिकाऱ्यांनी गुगल केल्यानंतर त्यांना त्यांची चूक लक्षात आली. त्यानंतर मात्र त्यांनी त्यांच्या वागणुकीत फरक पडला. नील नितीन मुकेश हा कुणाचा वारसदार आहे हे कळाल्यानंतर मग कुतूहलापोटी अधिकाऱ्यांनी त्याच्या वडिलांची, आजोबांची पूर्ण कुटुंबाची विचारपूस केल्याचं त्यानं मुलाखतीत सांगितलं.
नीलचा वारसा
आजोबा मुकेश हे बॉलिवूडमधील प्रचंड मोठं नाव. प्लेबॅक सिंगर म्हणून त्यांचा नाव लौकिक आहे. तर नितीन मुकेश हे नीलचे वडील त्यांनी देखील बॉलिवूडमध्ये गायक म्हणून नावलौकिक मिळवला आहे. मात्र नीलने अभिनयाचं क्षेत्र निवडलं. काही चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिकेचं कौतुकही झालं आहे. न्यूयाॅर्क, जाॅनी गद्दार यासारख्या सिनेमांमध्ये त्यानं काम केलं आहे.