पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये राज्यासह परराज्यांतून फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेने कमी झाली. मात्र, अपेक्षित मागणी नसल्याने आले, लसूण, काकडी, शिमला मिरची आणि मटारच्या भावांत 10 ते 20 टक्क्यांनी घसरण झाली. इतर सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव स्थिर होते.
गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 8 ते 10 टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी 4 ते 5 टेम्पो, कर्नाटकातून घेवडा आणि पावटा प्रत्येकी 3 ते 4 टेम्पो, आंध्रप्रदेश, तामीळनाडू येथून शेवगा 3 ते 4 टेम्पो, राजस्थान येथून 14 ते 15 ट्रक गाजर, कर्नाटकमधून 2 टेम्पो भुईमूग शेंगा, मध्य प्रदेशातून सुमारे 17 ते 18 टेम्पो मटार, तामीळनाडूतून 1 टेम्पो तोतापुरी कैरी, मध्य प्रदेशातून लसूण सुमारे 10 ते 12 टेम्पो आवक झाली होती. तर, स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 600 ते 700 गोणी, भेंडी 7 ते 8 टेम्पो, गवार 4 ते 5 टेम्पो, काकडी 8 ते 10 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, हिरवी मिरची प्रत्येकी 4 ते 5 टेम्पो, टोमॅटो 10 ते 12 हजार क्रेट्स, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, सिमला मिरची 10 ते 12 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा सुमारे 70 ते 80 ट्रक, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 35 ते 40 टेम्पो इतकी आवक | झाली होती, अशी माहिती मार्केट यार्डमधील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
कोथिंबीर, चवळईच्या भावांत वाढ
गुलटेकडी मार्केट यार्डमधील घाऊक बाजारात रविवारी कोथिंबिरीची सुमारे दीड लाख हजार जुडी, तर मेथीची 70 हजार जुडींची आवक झाली होती. आवक वाढल्याने गुलटेकडी येथील मार्केट यार्डमध्ये रविवारी करडई, अंबाडी आणि पालकच्या भावात घट झाली असून, कोथिंबीर आणि चवळईच्या भावात वाढ झाली होती. इतर सर्व पालेभाज्यांचे गेल्या आठवड्यातील दर स्थिर होते.
पापलेट, रावस, बांगडा, बोंबील, कोळंबीला मागणी वाढली
■ गणेश पेठेतील मासळी बाजारात देशाची पूर्व व पश्चिम किनारपट्टीहून रविवारी मासळीची आवक कमी झाली. बाजारात पापलेट, रावस, बांगडा, बोंबील, कोळंबीला मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने पापलेट, रावसचे दर तेजीत असून, बांगडा, बोंबील, कोळंबीचे दर स्थिर होते. इतर सर्व प्रकारच्या मासळीचे गेल्या आठवड्यातील दर स्थिर होते. इंग्लिश अंडी, गावरान अंडी आणि चिकन-मटण, गावरान अंडीचे दर स्थिर होते. रविवारी खोल समुद्रातील मासळी 10 ते 15 टन, खाडीच्या मासळीची 400 ते 500 किलो आणि नदीच्या मासळीची 1000 ते 1200 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून राहू, कटला आणि सिलनची सुमारे 15 ते 20 टन इतकी आवक झाली, अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकुर परदेशी, चिकन अंड्यांचे व्यापारी रूपेश परदेशी आणि मटणाचे विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी दिली.
बोरे, पपईच्या भावात वाढ; लिंबू स्वस्त
पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्ड फळबाजारात सर्व प्रकारच्या फळांची आवक चांगल्या प्रमाणात होत आहे. आवक कमी झाल्याने बोरे आणि पपईच्या भावांत वाढ झाली होती, तर आवक वाढल्याने लिंबाच्या भावात घसरण झाली होती. आवक-जाव कायम असल्याने इतर सर्व प्रकारच्या फळांचे भाव टिकून होते. गुलटेकडी मार्केट यार्ड फळबाजारात रविवारी जुन्या आणि नवीन बहरातील मोसंबी 40 ते 50 टन, संत्रा 50 ते 60 टन, डाळिंब 30 ते 35 टन, पपई 30 ते 40 टेम्पो, लिंबांची सुमारे दीड हजार गोणी, कलिंगड 25 ते 30 टेम्पो, खरबूज 7 ते 8 टेम्पो, चिकू एक हजार बॉक्स, पेरू 100 क्रेट्स, अननस 6 ट्रक, बोरांची 500 गोणी इतकी आवक झाली होती.
झेंडूला आला भाव
■ गुलटेकडी येथील मार्केट यार्ड फूलबाजारात झेंडू वगळता, सर्व फुलांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत साधारण होती. झेंडूच्या फुलांची आवक कमी झाल्याने झेंडूच्या भावात 10 टक्क्यांनी दरवाढ झाली होती. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत असल्याने इतर सर्व प्रकारच्या फुलांचे भाव स्थिर होते, अशी माहिती मार्केट यार्ड फूलबाजारातील आडतदार सागर भोसले यांनी दिली.