विलेपार्लेत कोट्यवधींचा दवाखाना धूळखात, आरोग्य सुविधा देणारे केंद्र सुरू करण्याची शिवसेनेची मागणी

विलेपार्ले पूर्व येथील शहाजी रोडवर स्वर्गीय मनोहर पर्रिकर आयुर्वेदिक दवाखाना व आरोग्य केंद्राची कोटय़वधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेली पाच मजली इमारत उद्घाटनाशिवाय गेली दोन वर्षे धूळ खात पडली आहे. हा दवाखाना आणि केंद्र मुंबई महापालिकेने लवकरच सुरू करून परिसरातील गरीब आणि गरजू रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर यांनी के-पूर्वचे सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू यांच्याकडे केली आहे. याबाबतचे सविस्तर निवेदनही देण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेच्या के-पूर्व विभागाच्या वतीने विलेपार्ले पूर्व येथे पाच मजली आयुर्वेदिक दवाखाना आणि आरोग्य पेंद्राची सुसज्ज इमारत कोटय़वधी रुपये खर्च करून उभारण्यात आली, मात्र गेली दोन वर्षे ही इमारत उद्घाटन न केल्यामुळे धूळ खात पडून आहे. सुसज्ज अशी इमारत आणि आरोग्य सुविधा पेंद्र असताना त्याचा परिसरातील रहिवाशांना उपयोग मात्र होत नाही. इमारतीतील कक्षांसाठी आवश्यक असलेल्या लाकडी फर्निचरसाठी अजूनही टेंडर काढण्यात आलेले नाही. सर्व गोष्टींची दखल घेऊन तत्काळ शिवसेनेचे विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर यांनी के-पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू यांची भेट घेऊन रहिवाशांची गैरसोय टाळून त्यांना तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या आरोग्य सुविधांचे उद्घाटन केले नाही तर शिवसेना आपल्या पद्धतीने त्याचे उद्घाटन करेल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शाखाप्रमुख प्रकाश सकपाळ, युवासेना चिटणीस आनंद पाठक, उपशाखाप्रमुख गणेश रहाटे, जितेंद्र शिर्पे, संदीप पेडणेकर, हितेश खानविलकर, राम जाधव आदी उपस्थित होते.