शहापुरात धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल चोरट्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश; बायकोला भेटायला गेला, जेरबंद झाला

शहापुरात धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल चोरट्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. कुंवरसिंग ठाक असे अटक केलेल्या घरफोड्याचे नाव असून तो नेरळमधून शहापुरात घरफोड्या करण्यासाठी येत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. तो पत्नीला भेटण्यासाठी नेरळमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी सापळा रचून त्याला जेरबंद केले.

शहापूर तालुक्यातील आसनगाव परिसरात घरफोडी, दरोडे व मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या प्रकरणी अनेक तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी तांत्रिक यंत्रणांच्या मदतीने तपास केला असता कुंवरसिंगची ओळख पटली. कुंवरसिंग हा सराईत गुन्हेगार असून त्याने पिंपरी-चिंचवड, अंबरनाथ, टिटवाळा, मुंबई अशा अनेक ठिकाणी घरफोड्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले.