अंबिष्टे येथील एका आदिवासी कुटुंबाच्या घराची भिंत अचानक कोसळली. डोक्यावरचे छप्पर जाणार या भीतीने चिंताग्रस्त झालेल्या दळवी कुटुंबाच्या मदतीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धावली आहे. पदाधिकाऱ्यांनी आदिवासी कुटुंबाची भेट घेऊन आर्थिक मदत केली. तसेच शासन दरबारी नुकसानभरपाईसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
अंबिष्टे येथे राहणारे जनार्दन दळवी यांनी 15 वर्षांपूर्वी घर बांधले. गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता त्यांची घराची भिंत अचानक कोसळली. मोठा आवाज झाल्याने घरातील सर्व सदस्यांनी प्रसंगावधान राखून बाहेर पळ काढला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरातील भांडी, कपडे, अन्नधान्य आणि इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
आम्ही सेवेकरी
भिंत कोसळल्याची माहिती मिळताच शहरप्रमुख प्रमोद घोलप यांनी घटनास्थळी धाव घेतली. दळवी कुटुंबाचे सांत्वन करत त्यांना किराणा साहित्य तसेच आर्थिक मदत दिली. यावरच न थांबता त्यांनी घर उभारणीसाठी लागणारे सर्व साहित्य दिले. सामाजिक बांधीलकीच्या भावनेने अपघातग्रस्तांच्या पाठीशी शिवसेना कायमच उभी असते याचा प्रत्यय प्रमोद घोलप यांनी दाखवून दिला. या वेळी नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, संघटक वर्षा गोळे, उपनगराध्यक्षा नयना चौधरी, शीतल दळवी आदी उपस्थित होते.