सावधान… पुढे ‘टायर किलर’ आहे ! विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना चाप

वाहतूक नियमांचे उल्लंघन करून विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांनो सावधान… कारण अशा वाहनचालकांना चाप बसवण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेने ‘टायरकिलर’ बसवले आहेत. स्टेशन परिसरातील पंजाब नॅशनल बँकेसमोर प्रायोगिक तत्त्वावर आज पहिला टायरकिलर बसवण्यात आला असून नियमांना पायदळी तुडवणाऱ्यांना चांगलाच दणका बसणार आहे.

स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी, विरुद्ध दिशेने वाहतूक, रिक्षाचालकांची मुजोरी आणि अपघात या सर्व बाबींना आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेने महापालिकेच्या मदतीने ठाण्यात पहिल्यांदा टायर किलर ही संकल्पना राबवली. लवकरच ठाणे शहरातील विविध ठिकाणी अशा प्रकारचे टायरकिलर बसवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक रोहिणी पवार यांनी दिली. या टायरकिलरवरून विरुद्ध दिशेने प्रवास केल्यास टायर पंक्चर होऊन मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी विरुद्ध दिशेने प्रवास करणे टाळावे, असे आवाहन या वेळी रोहिणी पवार यांनी केले आहे.