42 हजार रुपयांची फी एकरकमी भरल्यानंतर फक्त एक हजार रुपये फी बाकी राहिली म्हणून सिवूड येथील ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने दोन चिमुरड्यांना अघोरी शिक्षा दिली आहे. या वादग्रस्त शाळेच्या प्रिन्सिपल वैशाली सोलानी यांनी शिशूवर्गात शिक्षण घेणाऱ्या या दोन्ही चिमुरड्यांना वर्गातून बाहेर काढून डेकेअरमध्ये कोंडून ठेवले. सकाळी आठपासून ते दुपारी साडेबारापर्यंत ही दोन्ही मुले डेकेअरमध्येच होती. या कालावधीत त्यांना जेवण आणि पाणीही कोणी दिले नाही. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकांना मोठा धक्का बसला. एका पालकाने केलेल्या तक्रारीनुसार शाळेच्या प्रिन्सिपल आणि कोऑर्डिनेटर विरोधात एनआरआय पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सिवूड येथे राहणारे संतोष शांतप्पन यांचा पाच वर्षांचा मुलगा याच परिसरातील सेक्टर 42मध्ये असलेल्या ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिशूवर्गात शिक्षण घेतो. संतोष यांनी जुलै 2024मध्ये आपल्या मुलाची 42 हजार रुपये फी शाळेमध्ये भरली आहे. मात्र त्यांच्या मुलाची एक हजार रुपये फी बाकी असल्याचे कारण पुढे करून शाळेच्या प्रिन्सिपल वैशाली सोलानी यांनी मुलाला वर्गातून बाहेर काढले आणि डेकेअरमध्ये कोंडून ठेवले. संतोष यांच्या मुलाबरोबर अन्य एका मुलालाही डेकेअरमध्ये बसण्याची शिक्षा प्रिन्सिपलने दिली होती. संतोष हे आपल्या मुलाला शाळेत घेण्यासाठी गेले असता त्यांचा मुलगा वर्गातून बाहेर आला नाही. त्या वेळी त्यांनी वर्ग शिक्षिकेकडे विचारणा केली. त्या वेळी त्यांना सांगण्यात आले की, फी बाकी असल्यामुळे तुमच्या मुलाला प्रिन्सिपल घेऊन गेल्या आहेत. त्यानंतर ते बाकी असलेल्या फीचा भरणा करून प्रिन्सिपलकडे गेले असता त्यांना धक्काच बसला.
अशी ही बनवाबनवी
संतोष यांनी प्रिन्सिपलची भेट घेतली आणि मुलगा कोठे आहे, अशी विचारणा केली. त्या वेळी वैशाली यांनी बनवाबनवी केली. मुलगा स्वच्छता गृहात गेला असल्याचे खोटे सांगितले. मात्र प्रत्यक्षात मुलगा डेकेअरमधून बाहेर आल्याचे संतोष यांनी पाहिले. त्यांनी मुलाला विचारले असता त्याने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी प्रिन्सिपलला जाब विचारला असता ज्या मुलांची फी बाकी आहे त्यांना डेकेअरमध्ये बसवण्याच्या सूचना व्यवस्थापनाने केली आहे, असे मयूरपणे प्रिन्सिपलने सांगितले.
■ प्रिन्सिपल वैशाली सोलानी यांनी या दोन्ही मुलांना सकाळी आठ वाजता डेकेअरमध्ये कोंडल्यानंतर त्यांना दुपारी साडेबारा वाजता बाहेर काढण्यात आले. सुमारे साडेचार तास ही दोन्ही मुले डेकेअरमध्येच होती. या कालावधीत त्यांना जेवण आणि पाणी देण्यात आले नाही. या निर्दयीपणाबद्दल पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सीसीटीव्ही फुटेज देण्यास टाळाटाळ
ज्या दिवशी आपल्या मुलाला ही अघोरी शिक्षा देण्यात आली, त्या दिवसाच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी पालकाने शाळेच्या प्रिन्सिपलकडे केली. मात्र आठ मेल पाठवूनही शाळेने त्यांना सीसीटीव्ही फुटेज दिले नाही. त्यामुळे पालकांनी एनआरआय पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर शाळेने त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज पालकांना दिले. त्यातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आणि एनआरआय पोलिसांनी प्रिन्सिपल आणि कोऑर्डिनेटरच्या विरोधात गुन्हा दाखल केला.