<<< आशिष बनसोडे >>>
मासिक पाळी म्हणजे स्त्रियांसाठी कठीण काळ. त्यातही आदिवासी मुलींसाठी तर मासिक पाळी म्हणजे जणू अग्निपरीक्षाच. अस्वस्थता, वेदना आणि डाग लागेल या भीतीने त्या किशोरवयीन मुलींवर प्रचंड दडपण यायचे. पण आदिवासी विकास विभागाच्या प्रयत्नांमुळे हे चित्र बदलू लागले आहे. आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनी आता मासिक पाळीत चिंता मुक्त राहू लागल्या आहेत. कारण आवश्यक मार्गदर्शनाबरोबर त्यांना सॅनिटरी नॅपकिन मिळू लागले आहे.
मासिक पाळी ही नैसर्गिक असली तरी ती स्त्रियांना नकोसे करून सोडते. किशोरवयीन मुलींची तर त्यावेळी प्रचंड कुचंबना होते. ग्रामीण भागातील, त्यातही आदिवासी मुलींसाठी मासिक पाळी म्हणजे सहनही होत नाही आणि सांगता येत नाही अशी दयनीय अवस्था असते. शिक्षणाचा अभाव, रुढी-परंपरा, मासिक पाळीबद्दलची चुकीची व अर्धवट माहिती, नेमके करायचे काय याबद्दल असलेले अज्ञान, परिणामी आदिवासी मुलींची प्रचंड गैरसोय व्हायची. वेदना, अस्वस्थता यामुळे आदिवासी मुली भांबावून जायच्या. परिणामी त्यांचा आत्मविश्वास ढासळायचा. त्यामुळे घरातच राहणे, शाळेत न जाणे अशी अवस्था त्यांची व्हायची, पण आता सॅनिटरी नॅपकिनच्या रूपात त्यांना उपाय मिळाला आहे. आदिवासी विकास विभागाने यांची गंभीर दखल घेतली. वर्ष 2022 मध्ये राज्यातील प्रत्येक आदिवासी आश्रमशाळेत उच्च दर्जाचे सॅनिटरी नॅपकिन मोफत देण्यास विभागाने सुरुवात केल्याने मासिक पाळीमधील आदिवासी मुलींना येणारे टेन्शन आता कमी झाले आहे.
497 आश्रमशाळेत साडेआठ लाख सॅनिटरी नॅपकिनचे वाटप
राज्याच्या आदिवासी विकास विभागाने विविध जिह्यांतील 497 आश्रमशाळेतल्या 71 हजार 42 विद्यार्थिनींना गेल्या शैक्षणिक वर्षात आठ लाख 51 हजार 924 सॅनिटरी नॅपकिन वितरीत केल्या आहेत. त्यात नाशिक जिह्यातील 213 शाळेतील 29, 782, ठाणे जिह्यातील 127 शाळेतील 20,195, अमरावतीतल्या 82 शाळेतील 12 हजार 46 आणि नागपूर जिह्यातील 75 शाळेतल्या 71 हजार 42 विद्यार्थिनींचा समावेश आहे.
आदिवासी विकास विभाग आणि मिलेनियम वेल्फेअर फाऊंडेशन यांनी भागीदारीमध्ये सहा हजार 100 हॉट वॉटर इलेक्ट्रिक जेल बॅग आदिवासी आश्रमशाळेत पुरविल्या आहेत. या बॅगचा वापर वेदना कमी करण्यासाठी केला जातोय. अशा प्रकारे आदिवासी मुलींना मासिक पाळीत होणारी वेदना कमी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.
मुलींना मासिक पाळी सुरू झाल्याचे कळताच आश्रमशाळेच्या अधीक्षिका त्या मुलींची नोंद करून त्यांना मासिक पाळीची माहिती देण्याबरोबर सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करतात. एका पाकिटात आठ नॅपकिन असल्याने विद्यार्थिनींची गैरसोय होत नाही. शिवाय स्वच्छतेमुळे त्यांचे आरोग्यही उत्तम राहत आहे.