गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावर तातडीची बैठक बोलावण्याचे सरकारने आश्वासन दिले होते. मुंबईतील केंद्र सरकारच्या एनटीसी किंवा खासगी गिरण्यातील कामगारांना मुंबईतच घरे मिळणे शक्य आहे. फक्त सरकारची मानसिकता असावयास हवी. गिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्या, अशी मागणी शिवसेनेचे उपनेते आमदार सचिन अहिर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सरकारकडे केली.
मुंबईत जिल्हा नियोजन समितीची नुकतीच बैठक पार झाली. त्यावेळी गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत, या वाढत्या मागणीकडे आमदार सचिन अहिर यांनी मुंबईचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले. गिरणी कामगारांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्याग करूनही त्यांना मुंबईत का घरे मिळत नाहीत, असा जाब त्यांनी सरकारला विचारला. यावेळी मुंबईत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.