मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पसची जागा भाड्याने देऊ नका, युवासेनेची विद्यापीठाकडे आग्रही मागणी

मुंबई विद्यापीठातील कालिना कॅम्पस येथील जागा सूक्ष्मजीव आणि वनस्पती संवर्धनासाठी आरक्षित असून तिथे विद्यापीठाकडून वेटलॅण्ड प्रोटेक्शन एरिया असा फलकही लावण्यात आला आहे. मात्र, ही आरक्षित जागा व्यावसायिक कामासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. अशा प्रकारे विद्यापीठाची जागा कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक कारणांसाठी देऊ नये, अशी मागणी युवासेनेने मुंबई विद्यापीठाकडे केली आहे.

मुंबई विद्यापीठातील कालिना कॅम्पस येथे सूक्ष्मजीव आणि वनस्पती संवर्धनासाठी असलेल्या मोकळ्या जागेवर वेटलॅण्ड प्रोटेक्शन एरिया असा फलक विद्यापीठ प्रशासनाने लावला असताना जागा व्यावसायिक कामासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. ही जागा भाड्याने देण्यासाठी विद्यापीठ प्रशासनावर राजकीय दबाव होता का, असा प्रश्न युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी उपस्थित केला आहे. मात्र, विद्यापीठातील कोणतीही जागा व्यावसायिक कारणांसाठी उपलब्ध करू नये, अशी मागणी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, मयूर पांचाळ आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांना निवेदन देऊन केली आहे.

विद्यार्थी त्रस्त, ठोस धोरण राबवा!

गेल्या वर्षी राजकीय पक्षाचा मेळावा बीकेसी येथे झाला होता. त्यांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी वाहनतळाकरिता कालिना येथील विद्यापीठाची जागा देण्यात आली होती. अशा कार्यक्रमाने विद्यापीठात शिक्षण घेत असलेले तसेच विद्यापीठात येणारे विद्यार्थी त्रस्त होतात. त्यांच्या अभ्यासात व्यत्यय येत असतो. तरी विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी ठोस धोरण ठरवावे, अशी आग्रही मागणी युवासेनेच्या वतीने कुलसचिवांकडे करण्यात आली.