Mahakumbh 2025: विविध आखाड्यांच्या साधूंनी केले वसंतपंचमीचे अमृतस्नान, प्रयागराजमध्ये कोट्यवधी भाविक दाखल

वसंत पंचमीनिमित्त आज संगम तटावर साधू आणि आचार्यांनी पवित्र अमृतस्नान केले. या अमृतस्नानासाठी प्रयागराजमध्ये एक कोटीहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर राज्य सरकारने मोठा धडा घेतला असून प्रशासनाने दुर्घटना टाळण्यासाठी गर्दीवर ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे. कडक सुरक्षेत शाही अमृतस्नानाचा आनंद विविध आखाड्यातील लाखो साधूंनी घेतला. त्यानंतर भाविकांनी देखील अमृतस्नानासाठी गंगेत डुबक्या मारल्या.

यावेळी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून 2 ते 4 फेब्रुवारीपर्यंत प्रयागराज आणि महाकुंभ क्षेत्रात वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच व्हीव्हीआयपी पासही रद्द करण्यात आले आहेत.

मौनी अमावास्येच्या दिवशी अमृतस्नान सुरू होण्यापूर्वी प्रयागराजमध्ये चेंगचेंगरीची घटना घडली होती. या दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू तर 60 जण जखमी झाले होते. त्यानंतर निर्धारित वेळेच्या 10 तास उशिराने आखाड्यामध्ये अमृतस्नान सुरू करण्यात आले होते. या घटनेनंतर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. अखेर सरकारने काही कडक निर्णय घेत संगम तटावर चोख बंदोबस्त तैनात ठेवला आहे. सीसीटीव्ही, ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून गर्दीवर 24 तास नजर ठेवण्यात येत आहे.