कर्नाटकसारख्या छोटय़ा बसही एसटीत आणणार

ST-bus-Logo

महाराष्ट्रातील लाल परी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीच्या गाडय़ा गेल्या अनेक दशकांपासून एकाच आकाराच्या आणि आसन क्षमतेच्या आहेत. त्यामुळे एसटी गाडय़ांना वेग, वळणे, प्रवासी यांच्या मर्यादा पाळाव्या लागतात. हे टाळण्यासाठी एसटीमध्ये कर्नाटकच्या धर्तीवर 9 मीटरपासून 15 मीटरपर्यंतच्या वेगवेगळ्या बसेस आणण्याचा विचार सुरू झाला आहे. कर्नाटकमध्ये अशा बसेसना त्यांच्या क्षमतेनुसार ‘अंबारी’, ‘ऐरावत’, ‘राजहंस’ अशी नावेही दिली आहेत. एसटीच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने कर्नाटकातील परिवहन मुख्यालयाला भेट देऊन सर्व बसगाडय़ांची पाहणी केली. कर्नाटकच्या एसटी गाडय़ांमध्ये वाय-फायपासून युरिनलपर्यंत सर्व सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत. तशाच सेवा महाराष्ट्रातील प्रवाशांनाही भविष्यात मिळाव्यात यासाठी एसटी महामंडळाची आखणी सुरू आहे.