आज वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटप्रेमी अभिषेक शर्माच्या षटकारांच्या आतषबाजीत न्हाऊन निघाले. अभिषेकने 54 चेंडूंतील 135 धावांच्या विक्रमी खेळीत ठोकलेल्या 13 षटकारांनी हिंदुस्थानला 9 बाद 247 असा प्रचंड स्कोअर उभारून दिला तर हिंदुस्थानी गोलंदाजांनी पाहुण्या इंग्लिश संघाच्या फलंदाजांना शंभरीतच बाद करत ऐतिहासिक दीडशतकी विजय नोंदवला. हिंदुस्थानने पुण्यातच मालिका जिंकली होती. आज या मालिकेचा शेवटही खणखणीत विजयासह 4-1 असा केला.
आज वानखेडेवर सबकुछ अभिषेक शर्माच होता. त्याने पॉवर प्लेमध्येच षटकारांची आतषबाजी करत प्रेक्षकांना खूश करून टाकले. संजू सॅमसन (16) लवकर बाद झाल्यावर त्याने अक्षरशः षटकारांचे त्सुनामी आणली. त्याने 17 चेंडूंतच पन्नाशी ओलांडताना 5 षटकार खेचले, तर शंभरी गाठताना 10 षटकार ठोकले. त्याला डेव्हिड मिलर आणि रोहित शर्माच्या 35 चेंडूंतील शतकाच्या विक्रमाला मागे टाकण्याची संधी होती, पण त्याने 37 व्या चेंडूवर शतक साकारले. अभिषेकचा वेग पाहता हिंदुस्थान धावांचे त्रिशतक गाठणार असे वाटत होते. मात्र तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंडय़ा लवकर बाद झाल्यामुळे हिंदुस्थान 247 धावांपर्यंतच पोहोचला.
हिंदुस्थानच्या 248 धावांचे आव्हान पाहूनच इंग्लंडला दम लागले होते. सलामीवीर फिल सॉल्टने जोरदार सुरुवात केली, पण त्याला एकाही फलंदाजाची साथ लाभली नाही. परिणामतः इंग्लंडने पहिल्या पाच षटकांत सामना गमावला. सॉल्टने 23 चेंडूंतील 55 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे 97 धावांतच कोसळला. हिंदुस्थानकडून मोहम्मद शमीने 3 तर वरुण चक्रवर्थी, शिवम दुबे आणि अभिषेक शर्माने प्रत्येकी दोन विकेट टिपल्या.