जेवणाची आबाळ अन् खचलेला रस्ता

>> विठ्ठल देवकाते

उत्तराखंडमधील भाजप सरकारला 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे शिवधनुष्य पेलवताना दमछाक होताना दिसतेय. डेहराडूनमध्ये खेळाडूंचे जेवणाचे हाल सुरू आहेत, तर हल्दवानीमध्ये गौला नदीकिनारी खचलेला रस्ता पाच महिन्यांतही दुरुस्त होऊ न शकल्याने खेळाडू आणि क्रीडाप्रेमींचे या रस्त्यावरून ये-जा करताना अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे देशातील क्रीडा संस्कृती वाढीच्या गप्पा मारणाऱया भाजपचे यानिमित्ताने पितळ उघडे पडले आहे.

यंदाची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 12 शहरांमध्ये विखुरलेली असल्याने एक, तर उत्तराखंडमध्ये क्रीडा महोत्सवाचा माहोल तयार होऊ शकला नाही. त्यातच नियोजनाच्या अभावामुळे खेळाडूंची जेवणाची आबाळ होताना दिसतेय. जेवण संपलेले आणि खेळाडूंच्या जेवणासाठी रांगा असेही दुर्दैवी चित्र डेहराडूनमध्ये बघायला मिळाले. अनेक खेळाडूंनी जेवण संपल्यामुळे ताटकळत उभे रहावे लागल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

खचलेल्या रस्त्याचा ताप

हल्दवानी शहरातील गौला नदीच्या पार इंदिरा गांधी स्टेडियम आहे. गौला नदीच्या पार हे स्टेडियम असल्याने या भागाला गौलापार म्हणतात. याच ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धेतील काही क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. या गौलापारवर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार म्हंटल्यावर नदीकिनारी खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती होणे गरजेचे होते. जुलैमध्ये या गौला नदीला पूर आला होता. त्या पुराच्या पाण्याने येथील रस्ता खचला होता, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली, मात्र येथील भाजप सरकारने पाच महिन्यांचा कालावधी असतानाही या रस्त्याची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे ऐन राष्ट्रीय स्पर्धेच्या काळात हा रस्ता वन वे करण्यात आला आहे. या नदीपल्याड काही गावे असल्याने तेथील नागरिकांची वरदळ गौला नदीच्या पुलावरून सुरू असते. त्यामुळे सायंकाळच्या सत्रात तर खेळाडूंमुळे येथे प्रचंड गर्दी होते. त्या खचलेल्या रस्त्यामुळे हल्दवानीतील छत्री चौरा चौकात जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागतो. शिवाय हा वळसा घालण्यासाठी चांगला पर्यायी रस्त्याही नाहीये. अनेक गल्ली बोळातून फिरून मग छत्री चौरा चौकात यावे लागते. त्यामुळे रिक्षावालेही अधिक पैशांची मागणी करत प्रवाशांची पिळवणूक करतात. त्यामुळे खेळाडू आणि क्रीडाप्रेमींना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.