पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ नवा महाराष्ट्र केसरी, किताबी लढतीत महेंद्र गायकवाडवर मात

पुणे जिह्याचा पृथ्वीराज मोहोळ यंदाच्या 67 व्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा मानकरी ठरला. ‘महाराष्ट्र केसरी’च्या कीताबी लढतीत पृथ्वीराजने तांत्रिक गुणाधिक्याच्या जोरावर सोलापूर जिह्याच्या महेंद्र गायकवाडला लोळवून मानाची चांदीची गदा उंचावली. महेंद्र गायकवाडला ‘उपमहाराष्ट्र केसरी’वर समाधान मानावे लागले. नवा ‘महाराष्ट्र केसरी’ ठरलेल्या पृथ्वीराजला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गदा, चारचाकी गाडीची चावी देण्यात आली.

स्व. बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरीत रविवारी (दि. 2) ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाची अंतिम लढत गादीवर पार पडली. महेंद्र आणि पृथ्वीराज या तुल्यबळ मल्लांमधील किताबी लढत रंगतदार ठरली. चौदंडी झाली, डोक्याला डोकी भिडली. ब्लू कॉस्टय़ुम धारण केलेल्या महेंद्रने सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेतला, मात्र त्यात ताकदीने पृथ्वीराजने प्रतिकार केला. एक मिनिटानंतर दोघांच्या खात्यावर एकही गुण नव्हता. महेंद्रला निष्कियतेचा इशारा देण्यात आला. महेंद्रची प्रशिक्षण जर्सी फाटल्याने काही काळ खेळ थांबण्यात आला. पुन्हा खेळ सुरू झाल्यानंतर महेंद्रने पकड घेण्याचा प्रयत्न केला. 30 सेकंदांच्या कालावधीत महेंद्रने गुण न घेतल्याने पृथ्वीराजला एक गुण बहाल करण्यात आला. मध्यांतरापर्यत पृथ्वीराजने 1-0 आघाडी घेतली. मध्यंतरानंतर उभय मल्ल आक्रमक होताना दिसले. पृथ्वीराजच्या निष्क्रियतेमुळे महेंद्रला एक गुण दिल्याने 1-1 अशी बरोबरी झाली. शेवटचा एकच मिनिट शिल्लक राहिला असताना महेंद्र मॅटच्या बाहेर गेल्याने पृथ्वीराजला एक गुण देण्यात आला. पृथ्वीराजचे दोन तर महेंद्रचा एक गुण झाला. महेंद्रनेही गुणासाठी अपील केले, मात्र ते फेटाळून लावण्यात आले. त्यामुळे महेंद्र मॅट सोडून गेला आणि पंचानी पृथ्वीराजला विजेता घोषित केले.

राडा आणि 3 वर्षांची बंदी

गादी विभागातील अंतिम लढत नांदेडचा ‘महाराष्ट्र केसरी’ शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात रंगली. पहिल्याचा मिनिटात पृथ्वीराजने शिवराजला अस्मान दाखवत चितपट केले. पंचांचा हा निर्णय राक्षेला मान्य झाला नाही. त्याने रागाच्या भरात कुस्तीच्या आखाड्यात धिंगाणा घातला. त्याने थेट पंचांना लाथ घातली. कटकारस्थान रचून मला हरविण्यात आले. हा पराभव मला मान्य नाही, अशी प्रतिक्रिया शिवराजने दिली. पंचांशी हुज्जत घातल्याबद्दल महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे या दिग्गज पैलवानांवर कुस्ती परिषदेने 3 वर्षांची बंदी घातली आहे. माती विभागातील अंतिम लढत सोलापूरच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात रंगली. महेंद्रने मध्यांतरानंतर साकेतला चितपट करत ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाच्या अंतिम लढतीत प्रवेश केला.