राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा विजेतेपद जिंकण्यासाठी महाराष्ट्राने आपली पदकांची घोडदौड कायम ठेवली आहे. स्पर्धेच्या सहाव्या दिवशी महाराष्ट्राने पदकांचा अर्धशतकाचा पल्ला पार करीत पदकांचा सुवर्ण महोत्सव साजरा केला. 13 सुवर्णांसह 22 रौप्य, 15 कांस्य पदकांची लयलूट केली आहे. महाराष्ट्राने 38 व्या राष्ट्रीय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे.
स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकण्याची कामगिरीही टीम महाराष्ट्राने पहिल्या दिवसापासून कायम राखली. सुवर्ण पदकांची संख्या कमी असल्याने शुक्रवारपर्यंत महाराष्ट्र तिसऱया स्थानावर होता. शनिवारी सकाळच्या सत्रात खो-खोमधील 2 व डायव्हिंगमधील ऋतिका श्रीरामच्या पदकामुळे सर्वाधिक 10 पदके जिंकण्याचा करिश्मा महाराष्ट्राने करत अव्वल स्थान गाठले होते. महाराष्ट्राने जलतरणात 5, सायकलिंगमध्ये 1, ट्रायथलॉनमध्ये 2, नेमबाजीत 2, खो-खोत 2, स्क्वॉशमध्ये 1, अशी 13 सुवर्णपदके पटकावली आहेत. जलतरणात 5 सुवर्णपदकांसह 20 पदकांची कमाई केली आहे. कबड्डी, वुशु, रग्बी, वेटलिफ्टिंग, योगा खेळातही महाराष्ट्राने पदकांची कामगिरी केली आहे.
स्क्वॉशमध्ये महिलांना सुवर्ण, पुरूष संघाला रौप्य
महाराष्ट्राच्या महिला संघाने स्क्वॉशमध्ये प्रथमच सुवर्ण पदक पटकावले. अंतिम लढतीत अनिका दुबे हिने जखमी असतानाही झुंज देत सुवर्ण पदक खेचून आणले. पुरुष संघाने रूपेरी यश संपादन करून स्क्वॅशमध्ये डबल धमाका घडविला. अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या महिलांनी पहिली लढत गमावल्यानंतर तामीळनाडूवर 2-1 अशी मात केली आणि स्क्वॉश स्पर्धेतील महिलांच्या गटात सुवर्ण पदक खेचून आणले. पुरुषांच्या गटात मात्र महाराष्ट्राला तामीळनाडूकडून 0-2 असा पराभव पत्करावा लागला त्यामुळे महाराष्ट्राला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
राष्ट्रीय विक्रमासह वैष्णव ठाकूरची रुपेरी कामगिरी
महाराष्ट्राच्या वैष्णव ठाकूर या 23 वर्षीय खेळाडूने वेटलिफ्टिंगमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवित रुपेरी कामगिरी केली. राजगुरूनगर तालुक्यातील ठाकूर पिंपरी गावचा वैष्णव याने पुरुषांच्या 102 किलो वजनी गटात स्नॅचमध्ये 160 किलो वजन उचलले आणि जगदीश विश्वकर्मा याने नोंदविलेला 157 किलोचा विक्रम मोडला, मात्र क्लीन व जर्कमध्ये त्याला 175 किलो उचलता आले.
कबड्डीत महाराष्ट्राला कांस्यपदक
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांच्या कबड्डीमध्ये महाराष्ट्राला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत महाराष्ट्राला हरयाणाकडून 24-39 गुणांनी पराभव पत्करावा लागला. उपांत्यपूर्व फेरीत पश्चिम बंगालला हरवून महाराष्ट्राने उपांत्य फेरी गाठली होती.
राहीचे सोनेरी पुनरागमन
आजारपणामुळे जवळजवळ दोन वर्षे स्पर्धात्मक नेमबाजीपासून दूर असलेली कोल्हापूरची सुवर्णकन्या राही सरनोबतने 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सोनेरी वेध घेत शानदार पुनरागमन केले. सातव्या फेरीत राहीच्या पिस्तुलात बिघाड होऊनही संयमी खेळ करीत तिने 25 मीटर पिस्तूल प्रकारातील अंतिम लढतीत 35 गुणांनी सुवर्ण पदकाचा वेध घेतला.