नटूनथटून आलेले वऱ्हाडी भक्तगण आणि सनई चौघडय़ाच्या मंगलमय स्वरात श्री विठ्ठल-रखुमाईचा विवाह सोहळा वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर रविवारी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. देवाच्या अंगावर अक्षता पडताच डीजेवर ‘सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं…’ हे गाणं लागताच वऱ्हाडी मंडळींनी एकच जल्लोष करीत ठेका धरला.
वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर रविवारी श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेचा विवाह सोहळा परंपरेनुसार श्री विठ्ठल सभा मंडप येथे संपन्न झाला. सनई, चौघडे सप्तसुरांच्या साथीने दुपारी 12 वाजता अक्षता पडल्या. यावेळी भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सकाळी श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेला शुभ्र वस्त्र तसेच रुक्मिणी मातेस मोत्याचे दागिने, नथ आणि अलंकार परिधान करण्यात आले होते. रुक्मिणी मातेच्या गर्भागृहातून गुलाल विठ्ठलाकडे नेण्यात आला. तिथे गुलालाची उधळण केल्यानंतर विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणीमातेकडे नेण्यात आला. दुपारी 12 वाजता विठ्ठल-रुक्मिणीमातेची पाद्यपूजा सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, संभाजी शिंदे, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेची अलंकाराने सजवलेली उत्सवमूर्ती मंडपात आणण्यात आली आणि विधिवत शाही विवाह सोहळा साजरा झाला.
मंदिर आकर्षक फुलांनी सजवले
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. यामध्ये जिप्सी, डिजी, सूर्यफुल, गुलाब, रेड गुलाब, पांढरा गुलाब, पिंक गुलाब, पिवळा गुलाब, जरबरा, ऑर्किड जिनेयिम, तगर, गुलछडी, कामिनी, तुक्स, गोंड, बिजली, अस्टर, शेवंती, पासली, काडी, गिलाडो, डीर्शना इत्यादी सुमारे साडेतीन ते चार टन फुलांचा आणि एक टन उसाचा वापर करण्यात आला आहे.