पंतप्रधान मोदींचा ‘डिजिटल इंडिया’ महाराष्ट्रात सपशेल फेल, ग्रामीण भागातील 48 टक्के शाळा संगणकाविना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डिजिटल इंडिया महाराष्ट्रात फेल होऊ लागला आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील 48.3 टक्के शाळा आजही संगणकाविना आहेत, अशी धक्कादायक वस्तुस्थिती सर्वेक्षणातून उघड झाली आहे. इतकेच नव्हे तर अनेक शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे नसल्याचेही समोर आले आहे.

‘प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन’ या संस्थेने राज्याच्या ग्रामीण भागातील शाळांचे सर्वेक्षण करून ‘असर’ हा अहवाल नुकताच प्रकाशित केला. 409 प्राथमिक व 463 उच्च प्राथमिक व त्यावरील शाळा अशा एकूण 872 शाळांचे सर्वेक्षण केले गेले. 20.4 टक्के विद्यार्थ्यांकडूनच संगणकाचा वापर होत असल्याचेही अहवालात नमूद आहे. अनेक शाळांमध्ये मुलींकरिता स्वच्छतागृहे नाहीत, असेही या सर्वेक्षणात आढळले. राज्यात एकूण 1 लाख 8 हजार 144 शाळा आहेत. त्यापैकी फक्त 872 शाळांमध्ये या उणीवा दिसून आल्या. सर्व शाळांचे सर्वेक्षण केल्यास हे प्रमाण आणखी जास्त असू शकते. अहवालात काही सकारात्मक मुद्देही आहेत. गणित तसेच वाचनामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची प्रगती देशातील इतर राज्यांच्या तुलनेत खूपच चांगली असल्याचे हा अहवाल सांगतो.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेने या अहवालाबाबत काही स्पष्टीकरणे दिली आहेत. त्यानुसार, 78.40 टक्के शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध आहे. तसेच 96.8 टक्के शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे आहेत, असा दावा परिषदेने केला आहे. तसेच राज्यातील एकूण 2,09,61,800 शालेय विद्यार्थ्यांपैकी केवळ 33,746 मुलांचे सर्वेक्षण संस्थेने केले आहे. ते प्रमाण एकूण विद्यार्थ्यांच्या केवळ 0.16 टक्के इतके आहे, असे परिषदेने म्हटले आहे.

अहवालातील महत्त्वाचे मुद्दे…

  • इयत्ता तिसरीमध्ये गणितीय क्रियांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्र हा देशातील पहिल्या पाच राज्यांमध्ये आहे.
  • इयत्ता पाचवीच्या मुलांमध्ये सन 2022 च्या तुलनेमध्ये सन 2024 मध्ये वाचनामध्ये 2.2 टक्के अधिकची प्रगती झाल्याचे दिसून येते.
  • सर्वात कमी शाळाबाह्य विद्यार्थी असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र हे एक राज्य आहे.
  • महाराष्ट्रात 6 ते 14 वयोगटातील पटनोंदणी दर गेल्या आठ वर्षांपासून 99 टॊक्केपेक्षा जास्त आहे.