लुप्त होत असलेल्या कलांना ‘स्वदेश’मधून हक्काचे व्यासपीठ, देशाच्या कानाकोपऱ्यातील कला पाहण्याची मुंबईकरांना संधी

कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक राज्याची कला आणि हस्तकलेची विशिष्ट शैली आहे. देशाच्या कानाकोपऱयातील अशा विविध कलांचा इतिहास तेथील कलाकारांकडून जाणून घेण्याची तसेच या कलांचे लाईव्ह प्रात्यक्षिक पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. निमित्त आहे ते वांद्रे-कुर्ला संकुलातील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये सध्या सुरू असलेल्या ‘स्वदेश’ या अनोख्या प्रदर्शनाचे.

‘स्वदेश’ या प्रदर्शनात आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध पोचमपल्ली साडय़ा, चांदीवर हाताने सुंदर नक्षीकाम केलेली राजस्थानमधील चिताई ज्वेलरी, कश्मीरमधील आकर्षक पश्मिना शाल आणि गालीचे, तब्बल 4600 वर्षांची परंपरा असलेली आणि छत्तीसगडमधील आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारी ढोकरा शिल्पकला, लखनऊमधील नाजूक नक्षीकाम असलेली चिकनकारी, चित्र दाखवून त्या चित्रावरची कथा लोकांना गाऊन दाखवण्याची अनोखी परंपरा असलेली कोलकाता येथील कालीघाट चित्रकला, शिसवीच्या लाकडावर तारीची आकर्षण कलाकुसर असलेली जयपूरमधील तारकाशी अशा विविध कलांचा इतिहास लाईव्ह प्रात्यक्षिकदेखील पाहता येणार आहे. देशभरातील कलाकारांना आपल्या कलेचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ मिळावे यासाठी नीता मुकेश अंबानी यांनी ‘स्वदेश’ हा ब्रॅण्ड सुरू केला. त्याअंतर्गत बीकेसी येथील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर येथे कलाकृतींचे प्रदर्शन भरवले जाते. एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असून दर चार महिन्यांनी वेगवेगळ्या राज्यातील कलाकारांचे स्टॉल्स येथे उभारले जातात.

नव्या पिढीपर्यंत आमची कला पोहोचणार

या प्रदर्शनाबाबत जयपूरवरून आलेले तारकशी कलाकार योगेश कुमार शर्मा म्हणाले, मार्पेटमध्ये फायबर, प्लॅस्टिकच्या शोभिवंत वस्तू लोकांना स्वस्तात आणि सहज उपलब्ध होतात. त्यातुलनेत आमच्या परंपरागत हॅण्डमेड वस्तू महाग आहेत. त्यामुळे आमच्या व्यवसायाला याचा फटका बसलाय. नीता अंबानी यांनी सुरू केलेल्या ‘स्वदेश’ प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आमच्या लुप्त होत असलेल्या तारकाशी या कलेला हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. यानिमित्ताने आमची ही कला नव्या पिढीपर्यंत पोहोचत असून आमच्या कलेचा प्रचार आणि प्रसार होण्यास मदत होत आहे.